
रबर प्लांटेशन रडारवर
दोडामार्ग : रबर प्लांटेशनच्या आड गांजाची लागवड सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात पोलीस यंत्रणा अचानक सक्रिय झाली. विविध भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. अवैध धंदेवाल्यांचे पाळेमुळे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तालुक्यात तळ ठोकल्याचे बोलले जात असून अनेक रबर प्लांटेशन पोलिसांच्या रडारवर आल्याची माहिती समोर येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असताना त्याकडे पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांवर थेट निशाणा साधत पोलिस प्रशासन महिन्याला कोट्यवधी रुपयांचे हप्ते घेत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला होता. या आरोपांमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती.
निलेश राणे यांनी विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील काही भागांत रबर लागवडीच्या नावाखाली गांजाची शेती केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध रबर प्लांटेशन परिसरात पाहणी, चौकशी आणि तपासणी मोहिमा राबविल्या जात असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे. दोडामार्ग तालुका हा गोवा सीमेलगत असल्याने दारू तस्करी, अंमली पदार्थांचा अवैध व्यापार, मटका, जुगार आणि इतर बेकायदेशीर व्यवसायांसाठी संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत आ. राणे यांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.
काही ठिकाणी संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत केवळ चर्चेत असलेले काही मुद्दे आता प्रत्यक्ष तपासणीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे या मोहिमेतून नेमके काय निष्पन्न होते? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांच्या वाढलेल्या हालचालींमुळे अवैध धंद्यांशी संबंधित घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोडामार्गातील ही मोहीम केवळ औपचारिकता ठरणार की अवैध धंद्यांवर खऱ्या अर्थाने घाव घालणार? याची उत्सुकता आता वाढली आहे.














