
सिंधुदुर्गनगरी : महामार्ग अभियंत्यावर चिखलफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य २९ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र सार्वजनिक शांततेचा भंग करणे व शांतता भंग करण्यास इतरांना प्रवृत्त करणे या कलमाखाली पालकमंत्री राणे यांना दोषी धरून एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षाही ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आज हा निकाल दिला. दरम्यान राणे यांच्या वकिलांनी या निर्णयाला स्थगिती घेत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून घेतले होते. आमदारांनी बोलावल्याने पाहणीसाठी कणकवली येथील गडनदी पुलावर दाखल झालेल्या शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता. तसेच त्यांना बांधून ठेवले व त्यानंतर चिखलातून चालत नेले होते. ४ जुलै २०१९ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार आमदार नितेश राणे, समीर नलावडे, संजय कामतेकर, राकेश राणे, निखिल आचरेकर, अभिजित मुसळे, राजन परब, संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, संदीप मेस्त्री, रविंद्र घाडीगावकर, सदानंद हळदीवे, किशोर राणे, शिवसुंदर देसाई, सचिन पारधीये, विठ्ठल देसाई, मिलिंद मेस्त्री, संदीप नलावडे, सौ.मेघा गांगण, राकेश परब, जावेद शेख, अजय गांगण, सुशील पारकर, उपेंद्र पारकर, सिद्धेश वालावलकर, समीर प्रभुगावकर, औदुंबर राणे, लवू परब, शामसुंदर दळवी, संजीवनी पवार अशा एकूण ३० संशयित आरोपींवर भादवी कलम ३५३, ३३२, ३४२, ३२४, १४७, १४३, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, १०९, १२० ब सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयितांच्या वतीने ॲड. संग्राम देसाई यांनी तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.














