कुडाळ बाजारपेठेत 'मटका' पुन्हा सक्रिय ; प्रशासनाचा धाक ओसरला?

गजबजलेल्या ठिकाणी राजरोस व्यवहार
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 01, 2026 17:43 PM
views 226  views

कुडाळ : कुडाळ शहराची मुख्य बाजारपेठ ही जिल्ह्याचे आर्थिक केंद्र मानली जाते. मात्र, याच मध्यवर्ती बाजारपेठेत सध्या 'मटका' हा अवैध जुगार पुन्हा एकदा राजरोसपणे सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही कायद्याची भीती न बाळगता सुरू असलेल्या या व्यवहारांमुळे सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत असून, पोलिसांचा वचक कमी झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही काळापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्यावेळी पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती आणि अनेक ठिकाणी या धंद्यांचे धाबे दणाणले होते. मात्र,  धाकयुक्त कारवाईचा प्रभाव आता ओसरताना दिसत आहे. मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या या प्रकारांमुळे "प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे की याला कोणाचे अभय लाभत आहे?" अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

भरवस्तीत सुरू असलेल्या या मटक्यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करणार का, याकडे आता कुडाळवासीयांचे डोळे लागले आहेत.