LIVE UPDATES

'लकी ड्रॉ'च्या नावाखाली फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता

आणखी काही जण पोहोचले पोलीस स्थानकात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 20:40 PM
views 61  views

वैभववाडी : लकी ड्रॉच्या माध्यमातून स्वस्त दरात महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील आणखी काही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. समाजमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काही ग्राहकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चार दिवसांपूर्वी कोकिसरे-खांबलवाडी येथील दोन ग्राहकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ६० हजार रुपये किमतीचा टीव्ही अवघ्या १५ हजार रुपयांत देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी १५ हजार रुपये, असे एकूण ३० हजार रुपये घेतल्यानंतर दोन महिलांसह तिघेजण पसार झाले होते. यासंदर्भातील संदेश विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठविण्यात आला होता. खांबाळे परिसरातील काही ग्रुपवरही हा संदेश फिरत होता.

दरम्यान, गुरुवारी (ता. १३) सकाळी दोन महिला आणि एक पुरुष लकी ड्रॉची कूपने घेऊन खांबाळे परिसरात फिरत असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तिघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांची पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले.

दरम्यान, या घटनेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर कोकिसरे-बांधवाडी परिसरातील काही ग्राहकांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच लकी ड्रॉच्या कूपनव्यतिरिक्त दामदुप्पट रक्कम मिळवून देण्याच्या योजनेचे आमिष दाखवून ६५ वर्षांवरील एका महिलेचीही फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे.

त्यामुळे लकी ड्रॉच्या कूपनच्या माध्यमातून तसेच दामदुप्पट रकमेच्या आमिषाने झालेल्या फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता संशयास्पद व्यक्ती किंवा योजनांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.