
सिंधुदुर्गनगरी : घरपोच गॅस सेवा मिळत नाही, बुकिंग करूनही सिलिंडर वेळेत मिळत नाही, गॅस पाईप व रेग्युलेटरच्या नावाखाली सक्तीची वसुली, आणि ग्राहकांशी अरेरावीच्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या वेंगुर्ल्यातील गॅस ग्राहकांनी एकत्र येत वेंगुर्ल्यातील गॅस एजन्सी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्रस्त झालेल्या या नागरिकांनी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर या एजन्सी विरोधात उपोषण आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. याबाबतची नोटीस या ग्राहकांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे.
वेंगुर्ला येथील घरगुती गॅस वितरण एजन्सीविरोधात ग्राहकांनी सविस्तर तक्रारीचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सादर केले आहे. या निवेदनात घरपोच सेवेचा बोजवारा उडाल्याचा, ऑनलाइन बुकिंग करूनही दीर्घकाळ सिलिंडर न मिळाल्याचा, ग्राहकांची बुकिंग परस्पर रद्द केल्याचा तसेच सुरक्षा तपासणी, गॅस पाईप व रेग्युलेटरच्या नावाखाली सक्तीची वसुली केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
एजन्सीच्या मालक आणि कर्मचाऱ्यांकडून महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचाही आरोप केला आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय गॅस सिलिंडरची वाहतूक आणि हाताळणी करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही करण्यात आला असून, भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित एजन्सी जबाबदार राहील, असा इशाराही ग्राहकांनी दिला आहे.
या सर्व प्रकारांमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी प्रशासनाला १४ ऑगस्टपर्यंत कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.











