LIVE UPDATES

फणसगावातील चार शाळांना ‘जन आधार’ची शैक्षणिक साथ!

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 22:01 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी : सामाजिक बांधिलकी जपत जन आधार प्रतिष्ठान, फणसगाव यांच्या वतीने फणसगावातील चारही शाळांमध्ये वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाला प्रोत्साहन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले.

या उपक्रमाला जन आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष कोकाटे, उपाध्यक्ष दीपक तुकरूर, सचिव मंगेश गुरव, खजिनदार संतोष केसरकर, सल्लागार संदीप धुरी, दीपक मिस्त्री यांच्यासह प्रतिष्ठानचे अनेक सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याचे वाटप केल्यानंतर चारही शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच गावच्या पर्यावरणाचीही जपणूक’ या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचा आदर्श निर्माण केला.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव

कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली वायगडे यांनी जन आधार प्रतिष्ठानच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, गुणवंतांचा गौरव आणि शाळा परिसरात वृक्षारोपण अशा तिन्ही उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची व्यापक जोड मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.