LIVE UPDATES

सावंतवाडीत 'भीक मांगो' वरुन शिवसेना भाजपात 'राडा'

आमदार केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी तालुक्याच्या आमसभेचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 19:34 PM
views 75  views

सावंतवाडी : आरोग्याच्या प्रश्नावरून आज पार पडलेल्या आमसभेत भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. आरोग्य कृती समितीचे अध्यक्ष एन.बी रेडकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकारकडे आरोग्याच्या प्रश्नावर पैसे नसतील तर आम्ही 'भीक मांगो' आंदोलन करू असे सांगितले. यावर शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे यांनी आक्षेप घेतला.‌ या मुद्द्यावरून झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले. मात्र, पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे आणि आम. केसरकर यांनी सभागृहाला शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतर ही परिस्थिती निवळली. तसेच पाणी, वीज, रस्ते, शक्तीपीठ, रोजगार, नेटवर्क आदी विषयांवर लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले.

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये तब्बल ९ वर्षांनी सावंतवाडी तालुक्याची आमसभा पार पडली‌. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती सुस्मिता जाधव, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी निलेश जाधव, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत आदींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक उपस्थित होते.

आरोग्यप्रश्नी झालेल्या गदारोळावेळी श्री. केसरकर यांनी सभागृहाला संयमाने घेण्याचे आवाहन केले. थेट आपल्याशी संवाद साधावा असे सांगितले. तसेच आरोग्याच्या प्रश्नावर स्वतंत्र बैठक आयोजित केली असून त्यावेळी आपले प्रश्न मांडा अशीही सुचना श्री. केसरकर यांनी केली. मल्टीस्पेशालिटीचा विषय चर्चेचा ठरला. मल्टीस्पेशालिटीचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे. या संदर्भातील न्यायालयाचा निर्णय होणार असून 85 कोटीचा अंदाजपत्रक तयार आहे. ते प्रशासनाकडे सादर केले जाईल, दुसरीकडे आयुष मंत्रालय भारतची ओपीडी सावंतवाडी सुरू होत आहे. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निश्चितच सुटतील असे श्री. केसरकर यांनी सांगितले. मात्र, याच विषयाला धरून वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी मल्टीस्पेशालिटीसाठी जागा उपलब्ध होत नसल्यास आम्ही जागा देण्यासाठी तयार आहोत. त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी उभारा असे स्पष्ट केले.

तारीख पे तारीख मध्ये जनतेला आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब वाढलेल्या व्यक्तींना सुद्धा गोव्याला रेफर केले जाते असा आरोप केला. यावेळी आम. केसरकर यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे आणि जागेचा प्रश्न सुटणार आहे. दरम्यान, रुग्ण संदर्भातील तक्रारीवर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांना लक्ष द्यावी अशी सूचना केली. 

आमसभेत आजगावसह काही गावात प्रस्तावित मायनिंग प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग या विषयावरही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी लोकांचा मायनिंग प्रकल्पाला विरोध असल्यास माझाही विरोध राहील. तसेच शक्तिपीठ महामार्गासंदर्भात नव्याने सर्वे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन मिळाले असल्याचेही श्री. केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच चंद्रकांत जाधव यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लागावी अशी सूचना केली. ती पुढच्या सभेला तातडीने पूर्तता करण्याचे आदेश केसरकर यांनी दिले. माजी सभापती पंकज पेडणेकर यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील अपूर्ण रस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला ती अर्धवट कामे नवीन योजनेतून सुचवण्याचे आदेश श्री. केसरकर यांनी दिले. सांगेली घोलेवाडी अरुंद पुलाची उंची वाढविण्यात यावी अन्यथा तिथे नवीन पूल उभारण्याची मागणी सभेत अभय किनळोसकर यांनी केली. केसरकर यांनी पुढच्यावर्षी बजेटमध्ये हे पूल घेण्याचे आश्वासन दिले.

माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी धवडकी, शिरशिंगे, गोठवेवाडी रस्ता जमीन संपादन विषय रखडला आहे. रस्ता रुंद होणे महत्वाचा असून तेथील पर्यंटन बहरेल अशी सूचना केली. त्यावर कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी या रस्त्यासाठी बजेट मधून प्रस्ताव केला आहे. त्यासाठी २५ कोटी निधी मंजूर आहे. शिरशिंगे, गोठवेवडी रस्ता वर्क ऑर्डर झाली असून फॉरेस्टमूळे काम अडलेय अशी माहिती दिली. डीएफओ वनविभाग व वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करू असे केसरकर यांनी सांगितले.  

तसेच देवसू ग्रामसचिवालय काम रखडले यासाठी निधी नाही.  त्याकरिता अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दहा लाख निधी देण्याचे आश्वासन दिले. पंढरी राऊळ यांनी शिरशिंगे व देवसू दोन्ही धरणाचे काम रखडल आहे‌. सध्या काम बंद असून पाऊस कमी प्रमाणात होतो त्यामुळे पाणी प्रश्न उभा राहील व सांगेली पीएचसी पोस्टमार्टम करिता एमबीबीएस डॉक्टर द्यावे अशी मागणी केली. जि. प‌. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी डॉक्टर मंजूर केले असूते लवकरच हजर होतील असे सांगितले.

निशांत तोरसकर यांनी सावंतवाडी शहरातील भटके कुत्रे, मोकाट गायी गुरे यांचा प्रश्न आहे. शिवाय, शहरतील रस्ते खड्डेमय झालेत. गॅस व नळ पाणी करता एकत्र खोदाई करण्यात असल्याने दुर्दशा झाली आहे. याबाबत बैठक झाली असून  लवकरच डांबरीकरण पावसानंतर केले जाईल असे आम. केसरकर यांनी दिले. साई काणेकर यांनी बांदा पात्रादेवी रस्त्याची दुरवस्था झाली ,सरखारने पैसे उपलब्ध करून दिले रस्ता दुरुस्त का होत नाही असा सवाल केला.

तर गजानन गायतोंडे यांनी शक्तिपीठ महामार्ग विषय चर्चेत आहे. बांदा शहराने आत्तापर्यत कित्येक जमिनी दिल्यात‌‌. आता या महामार्गाला जमीन देणार नाही असे सांगितले. यावर केसरकर यांनी मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले, पुन्हा पाहणी होईल असे सांगितले. ॲड. तेजस परब यांनी डेटा सेंटर व ५०० युवकांना रोजगार नोकरी मिळणार होती त्याचे काय झाले ? युवक जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत. रोजगार कधी येणार ? झेन झी बाहेर प्रश्न विचारत आहेत असा प्रश्न केला. यावर मी काय घोषणा केल्या याची माहिती घ्यावी, तर इतर माहितीसाठी येऊन भेटा असे केसरकर यांनी सांगितले.

 मायकल डिसोजा यांनी कोलगावला पाणी मिळत नाही. त्यामुळे पालिकेच्या नवीन पाईपलाईन योजनेचे काम करू देणार नाही. सावंतवाडीत पालिका भरमसाठ भाडे घेत आहेत. स्थानिक रोजगार टिकवणे कठीण आहे असा आरोप श्री. डिसोजा यांनी केला. त्यावर नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी कायदेशीर परवानगी घ्यावी, नियमा नुसार भाडे घेतले जाईल सहकार्य करू असे आश्वासन दिले. तसेच संबंधित कंपनी आपला फायदा बघते. न.प.चा नाही, पालिकेच्या विरोधात कोर्टात गेल्याचं सांगत कोर्टानं स्टे नाकारल्याचे त्यांनी सांगितले.

तर पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी सभेत सातार्डा उत्तम स्टील येथील जुनाच रस्ता दुरुस्त करून सुरू ठेवावा अशी मागणी केली. तर प्रकल्पाच्या जागेत रोजगार आणावेत आमची मुले गोव्यात जातात, दरवर्षी वीस मुले मरतात. आम्हाला हॉस्पिटल नको तर रोजगार द्या, कंपन्यां आणा असे सांगितले. यावर केसरकर यांनी तिथे एमआयडीसी आणली जाईल, उद्योगमंत्र्यांशी बोलू असे आश्वासन दिले.

शक्तिपीठ महामार्ग असनिये, डेगवे, तांबोळी, बांदा मार्गे जाईल यावर मार्ग काढा. अन्यथा, आम्ही उध्वस्त होऊ असे संदीप सावंत यांनी सांगितले. यावर केसरकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट झाली आहे. नवीन सर्व्हे करू असे आश्वासन दिले. मिहिर मठकर यांनी रेल्वे टर्मिनस येथे नवीन गाड्या आणि नामकरण केल्याबद्दल आमदार केसरकर, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सभेत अभिनंदन केले. तसेच रेल्वे स्थानकाला तिलारी योजनेतून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. उपसभापती गौरव मुळीक यांनी या मुद्द्यावर मळगाव, नेमळे, वेत्येला या योजनेतून पुरवठा होत नसल्याचे सांगत त्यावर कार्यवाहीची मागणी केली. यावर श्री केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले.

दरम्यान, नाणोस येथील दोन कोटीच्या पुलाला तडे गेल्याची तक्रार सागर नाणोसकर यांनी सभेत केली. ठेकेदाराने संबंधित पुल चुकीच्या पद्धतीने बांधल्याने सद्यस्थितीत पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करा, पुलाची डागडुजी करा अशी मागणी सभेत केली. यावर सा.बा विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी एक्सपर्ट टीम येऊन तपासणी करेल त्यांनतर उपाययोजना करू, ठेकेदारावर कारवाई सुरू आहे असे सांगितले. यावर आमदार केसरकर यांनी योग्य ती कारवाई करून पुलाची तातडीने दुरुस्ती करावी असे आदेश दिले.

मात्र, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी अशा प्रकारे चुकीची कामे होत असतील आणि अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असतील तर ते चुकीचे असल्याचे सांगत खडेबोल सुनावले. या सभेत रस्ते, पाणी वीज, रोजगार, बीएसएनएल नेटवर्क अशा मूलभूत विषयावर अनेक प्रश्न मांडण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्येक प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांची उजळणी घेत संबंधितांना समर्पक उत्तरे दिली. वेळ पडल्यास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले.