
कणकवली : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोकण रेल्वेतर्फे २७ जूलैला तब्बल १३ गाड्या व त्यांच्या २६० फेर्यांची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी आणखी १८ रेल्वे फेर्यांची घोषणा करण्यात आली. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा १३ गाड्यांच्याच फेर्यांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यातील अनेक गाड्यांची आरक्षण प्रक्रिया स्वातंत्र्यदिनीच सुरु होत असल्याचेही कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनातर्फे प्रतिवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. यावर्षी ४०० फेर्या सोडणार असल्याचे कोकण रेल्वेतर्फे 'कोकणसाद'शी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यानुसार आता १८ फेर्यांची घोषणा झाली असून लवकरच जादा रेल्वेगाड्या व त्यांच्या फेर्या जाहीर करण्यात येतील, अशी माहितीही कोकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.










