
कणकवली : अवैध गांजा बाळगल्याबाबत एलसीबीच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी घडली होती. याच घटनेत आणखीन दोन संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली. संशयित शुभम गजानन राणे (२२) व संशयित आशिष अनिल बाईत (२२) दोघेही रा. कणकवली – निम्मेवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान गुरुवारी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांपैकी एकजण अल्पवयीन असून अन्य संशयित सूर्यकांत राघो घाडीगावकर (२९, रा. वागदे - देऊळवाडी) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
गुरुवारची कारवाई एलसीबीने पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली केली होती. यात दोन संशयितांना ताब्यात घेतानाच १,७९८ किलो ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा तसेच संशयितांनी वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. एक संशयित अल्पवयीन असल्याने अल्पवयीनांच्या अनुषंगाने असलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. तर अन्य संशयिताची कसून चौकशी केली असता शुभम व आशिष अशा दोघांची नावे उघड झाली. त्यानुसार कणकवली पोलिसांनी राहत्या घरातून त्यांना अटक केली.
सदरचा गांजा शुभम यानेच कोल्हापूर येथून आणला. त्यासाठी शुभम व आशिष असे दोघे दुचाकीने कोल्हापूरला गेले होते. तेथून आल्यानंतर हा गांजा त्यांनी संशयित सूर्यकांत व त्याच्यासोबतचा अल्पवयीन यांच्याकडे सुपूर्द केला, अशी माहितीही पोलीस तपासात प्राप्त झाली आहे. शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.














