LIVE UPDATES

Kudal Bribe Case : चांदीची अंगठी लाच म्हणून घेणाऱ्या 'त्या' कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 20:14 PM
views 53  views

कुडाळ : ना हरकत दाखला देण्यासाठी १,२०० रुपये मूल्याच्या चांदीच्या अंगठीची लाच मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील संशयित आरोपीला सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपीला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा निर्णय सिंधुदुर्गचे विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी दिला.

​लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सिंधुदुर्गच्या पोलीस निरीक्षक विद्या विशाल जाधव यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील रंजना पाटील आणि तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून तपास अद्याप अपूर्ण आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, आरोपीच्या आवाजाचे नमुने गोळा करणे, लाच म्हणून मागितलेली खडे जडवलेली चांदीची अंगठी हस्तगत करणे आणि या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेणे आवश्यक असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

​दुसऱ्या बाजूने आरोपीतर्फे ॲड. जी. एस. देसाई यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी संदर्भातील तपास पूर्ण झाला असून सर्व पंचनामे झाले आहेत. १,००० रुपयांची पावती देऊन ना-हरकत प्रमाणपत्र आधीच देण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही वसुली बाकी नसल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी.

​दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, कुडाळ नगरपंचायतीमध्ये लोकसेवक म्हणून कार्यरत असताना ना-हरकत दाखल्यासाठी १,२०० रुपयांच्या चांदीच्या अंगठीची लाच मागणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आणि आवाजाचे नमुने घेणे आवश्यक असल्याने न्यायालयाने आरोपीला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.