LIVE UPDATES

स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये ‘दहीहंडी’ उत्सव जल्लोषात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 20:28 PM
views 18  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘दहीहंडी’ उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाच्या तासाने झाली. यावेळी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका रश्मी बांदेकर यांनी कृष्णजन्माष्टमीनंतर दहीहंडी का साजरी केली जाते, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका अमृता सावंत यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या समन्वयक सुषमा पालव व सहा. शिक्षिका अमृता सावंत यांनी केले. शाळेच्या मैदानात आकर्षक दहीहंडी बांधण्यात आली होती. ‘गोविंदा रे गोपाळा’ या जयघोषाने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची रंगीत वेशभूषा. यामध्ये कु. रायांश करिवडेकर याने श्रीकृष्णाची, तर कु. मुग्धा प्रभू तेंडोलकर हिने राधेची वेशभूषा परिधान केली होती.

इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोन गट करण्यात आले होते. दोन्ही गटांनी उत्साह, शिस्त आणि उत्तम समन्वयाचे दर्शन घडवत दहीहंडीचा उपक्रम व्यवस्थितपणे पार पाडला.

दरम्यान, इयत्ता २ री, ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी भाटवाडी येथील इस्कॉन मंदिरात आयोजित जन्माष्टमी भजन सेवेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भक्ती, उत्साह आणि आत्मविश्वासाने ‘नंदकिशोरा, चित्तचकोरा’ हे भजनगीत सादर करून मंदिर परिसरात शांत आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण केले. या भजनगीताकरिता विद्यार्थ्यांना प्रशालेच्यासंगीत विषयाच्या सहा. शिक्षिका सौ. ईश्वरी तेजम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या अप्रतिम सादरीकरणाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

भक्ती, उत्साह, आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम घडवत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने दुमदुमलेला हा दहीहंडी उत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व अविस्मरणीय ठरला.