
देवगड : जिल्हाभरात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. देवगड तालुक्यातही गावागावांत सार्वजनिक मंडळे, फ्रेंड सर्कल, इंद्रधनुष्य मंडळांसह विविध गोविंदा पथकांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरापासून सुरू असलेला गोविंदांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम होता.
देवगड शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आकर्षक दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. गोविंदा पथकांनी ढोल-ताशांच्या गजरात तसेच ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात हंडी फोडण्यासाठी थर रचले. आठ वाजेपर्यंत देवगड परिसरातील अनेक दहीहंड्या फोडण्यात आल्यानंतरही गोविंदा पथकांचा उत्साह आणि जल्लोष सुरूच होता.
दरम्यान, पडेल कॅन्टीन येथे व्यापारी रिक्षा-रिक्षा टेम्पो संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीला विशेष रंगत आली. या दहीहंडीला श्रीराम गोविंदा पथक, जामसंडे यांनी पाच ते सहा थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर बालशिवाजी गोविंदा पथक, तिर्लोट यांनीही उत्साहात दहीहंडी फोडली.
दहीहंडी फोडताना गोविंदा पथकांच्या थरांचा थरार, ढोल-ताशांचा गजर आणि उपस्थित नागरिकांचा जल्लोष यामुळे पडेल कॅन्टीन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तालुक्यातील इतर ठिकाणीही रात्री उशिरापर्यंत दहीहंडी फोडण्याचा गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहिला.










