LIVE UPDATES

माजगाव रमाईनगर येथील जीर्ण पूल धोकादायक अवस्थेत

सा.बां.वि कार्यकारी अभियंत्यांना निवेदन : आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 20:45 PM
views 27  views

सावंतवाडी : माजगाव रमाईनगर येथील जीर्ण झालेला पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत असून पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सिमेंट-काँक्रीट उखडल्याने या पुलावरून दररोज ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांसह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे मंत्री नितेश राणे यांनी या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला असतानाही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत पुलाची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करण्याची मागणी केली. यापूर्वीही पत्रव्यवहार करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याने आता प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, निविदा प्रक्रिया पुढील आठ दिवसांत पूर्ण करून त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण अर्जुन सावंत उर्फ बाबू सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत, अजय सावंत, माजगाव पोलीस पाटील विनोद जाधव, माजी उपसरपंच संजय कानसे, उपसरपंच रिचर्ड डिमेलो उपस्थित होते.