LIVE UPDATES

ग्रामस्थांना वाटप होण्यापूर्वीच ग्रामपंचायत कार्यालयातून १०० बॅटऱ्या 'गायब'

कोलझर सरपंचांची दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 05, 2026 20:02 PM
views 23  views

दोडामार्ग : हत्तींच्या वाढत्या वावरामुळे कोलझर परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या तब्बल १०० बॅटऱ्या ग्रामपंचायत कार्यालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात कोलझर सरपंच सुजल सूर्यकांत गवस यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

शुक्रवारी सकाळी सुमारे ९.४० वाजता ग्रामपंचायत कार्यालय सुरू केल्यानंतर कार्यालयातील साहित्याची पाहणी करण्यात आली. त्यावेळी वन विभागाकडून ग्रामस्थांना देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या बॅटऱ्या दिसून आल्या नाहीत. अधिक तपास केला असता सुमारे १०० बॅटऱ्या बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायत कार्यालयात अनधिकृतरीत्या प्रवेश करून अज्ञात व्यक्तीने या बॅटऱ्या चोरून नेल्या असाव्यात, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य कार्यालयातून बाहेर नेण्यात आले असल्याने चोरीची वेळ आणि पद्धत याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हत्तींच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर साहित्य

कोलझर परिसरात गेल्या काही काळापासून हत्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना सुरक्षितपणे वावरण्यासाठी प्रकाशाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने वन विभागाने बॅटऱ्या दिल्या होत्या. संबंधित बॅटऱ्यांचे ग्रामस्थांना वाटप होण्यापूर्वीच त्या गायब झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

पोलिस तपासाकडे ग्रामस्थांचे लक्ष

या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरीला गेलेल्या सर्व बॅटऱ्यांचा शोध घ्यावा, तसेच चोरीमागील व्यक्तींचा तत्काळ छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच सुजल गवस आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. वन विभागाने सुरक्षेच्या उद्देशाने दिलेले साहित्य ग्रामपंचायत कार्यालयातूनच गायब झाल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.