लग्नसराईत दागिन्यांची चोरी

३ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास
Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2026 20:22 PM
views 44  views

सावंतवाडी : तालुक्यातील कारिवडे येथे एका साखरपुडा समारंभासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले. याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. क्रांती सावंत या मंगळवारी (१२ मे) सकाळी १०:३० वाजता आपल्या पतीसह नरडवे येथून नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी कारिवडे येथे आल्या होत्या. त्यांनी नरडवे ते कणकवली आणि त्यानंतर सावंतवाडीमार्गे कारिवडे असा एसटी बसने प्रवास केला होता. त्यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार आणि अंगठ्या असा मौल्यवान ऐवज एका डबीत ठेवला होता. कारिवडे येथील संबंधित नातेवाईकाच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आपली पर्स घरात ठेवली आणि त्या काही वेळ वॉशरूमला गेल्या. अवघ्या १० मिनिटांत परत आल्यावर त्यांनी पर्स तपासली असता त्यातील दागिन्यांची डबी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ घरभर आणि परिसरात शोध घेतला. मात्र दागिने मिळून आले नाहीत. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्या मुलासोबत घरी परतल्या. दागिने विसरून घरीच तर राहिले नाहीत ना ? याची खात्री केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा कारिवडे येथे जाऊन शोध घेतला. मात्र, दागिने न मिळाल्याने अखेर त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सावंतवाडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञातावर चोरीचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत. लग्नसराईच्या गर्दीचा फायदा घेत चोरी झाल्याने खळबळ माजली आहे.