LIVE UPDATES

पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार, सभापतींच्या राजीनाम्याची मागणी

संजू परब यांच्यासह शिवसेना नगरसेवक आक्रमक : आपल्याला बापूसाहेबांचा वारसा, दोषींवर कारवाई होईल : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 10, 2026 16:27 PM
views 70  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी, मागणी मासिक बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी केली. तसेच या प्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांनाच बळीचा बकरा न करता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही त्यांनी केली.

आपल्याला बापूसाहेब महाराजांचा वारसा लाभला असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याच्या मुळाशी जाऊन चौकशी केली जाईल व जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिले.

नगरपरिषदेची मासिक बैठक आज लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली. यावेळी शहरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आवश्यक ठराव घेण्यात आले. मात्र, आयत्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचारावर जोरदार चर्चा झाली.

नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगावकर व नगरसेवक देवेंद्र टेमकर, देव्या सुर्याजी यांनी या विषयाला हात घालत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भातात मुख्याधिकारी अहवाल का देत नाहीत ? तसेच या विभागाचे गहाळ झालेल्या रजिस्टर संदर्भात ठराव घेऊनही अद्यापही एफ.आय. आर. दाखल का केली जात नाही ? असा सवाल उपस्थित केला.

यावर झालेल्या चर्चेत समर्पक उत्तर मिळत नसल्याने नगरसेवक संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेत या सर्व बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून पाणीपुरवठा सभापती श्री. बांदेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

यावर सभापती श्री. बांदेकर यांनी आपली बाजू मांडली. संबंधित भ्रष्टाचाराचा प्रकार उजेडात येताच कुठलेही बिल अदा करू नये असे आदेश आपण तात्काळ दिले होते. तसेच झालेल्या चौकशीमध्ये प्रशासन काळात बजेट पेक्षा जास्त बिल अदा केली गेली. गहाळ झालेल्या रजिस्टर संदर्भात तक्रार दाखल करण्यासंदर्भातही आपण लेखी पत्र मुख्याधिकारी यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नगराध्यक्षा सौ. भोसले यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच ठराव आणि टिप्पणी वाचनावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत तोडगा काढत पुढील विषय वाचण्यास सहमती दिली.

दरम्यान, शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न घालण्याचे प्रकार पुढे आले आहेत त्यामुळे कुत्र्यांची संख्या शहरात वाढली असून यावर निर्बंध आणण्यासाठी तशा प्रकारचे अन्न घालण्याची चार ठिकाणी नगरपालिकेकडून जागा निश्चित करण्यात आली असून त्याच ठिकाणांमध्ये जाऊन नेमणूक केलेल्या व्यक्तीने कुत्र्यांना जेवण देणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नियम व अटीची तरतूदही असणार असे सांगण्यात आले.

या चार ठिकाणांमध्ये झिरंग भाग, चिटणीस नाका परिसर, मियाॅसाब समाधी परिसर व मोरडोंगरी परिसरामध्ये जागा निश्चिती करण्यात आली आहे. मात्र, मोरडोंगरी परिसर हा आपल्या प्रभागात येत असल्याने तेथील लोकांशी सहमती घेऊन ही जागा निश्चित केली गेली आहे का ? असा प्रश्न नगरसेवक अजय गोंदावळे यांनी उपस्थित केला. या प्रभागातील लोकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास नको असे ते म्हणाले. यावर नगराध्यक्षांनी ज्यांची कोणाची तक्रार असेल त्यांनी उद्यापर्यंत यावर हरकत नोंदवण्याचे आवाहन केले.

तर नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी कॉम्प्लेक्समधील दुकान काळेधारकांना भाड्याची रक्कम भरणा करण्यास मुदत मिळण्यासंदर्भात व प्रीमियम रक्कम भरण्यास सूट मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक संजू परब यांनी प्रीमियम रक्कम माफ होऊ शकते का या संदर्भात विचार करण्यात यावा तर गाळे भाडे हे तीन टप्प्यात वसूल करण्यात यावे अशी मागणी केली.

यावर नगराध्यक्षांनी गाळे भाडे वसूल केल्यानंतरच प्रीमियम संदर्भात निर्णय घेऊ आपल्यापर्यंत अद्यापही एकही व्यापारी आलेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची मागणी आल्यास यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या कचरा मुक्त अभियानाच्या संकल्पनेनुसार शहरातील विविध ठिकाणी जीव्हीपी पॉईंट सुशोभीकरण करणे यावर चर्चा झाली. मात्र, हे काम करत असताना शहरात शिल्पग्राम परिसरातील तिठ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरलेला असतो, यावर नगरसेवक अजय गोंदावळे यांनी आवाज उठवत नाराजी व्यक्त केली.

अशा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात तीन ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संबंधितांवर मोठ्या रकमेची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर शहरातील अन्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात निधीची मागणी करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षांकडून सगळ्यात आले. निधी उपलब्ध झाल्यास शहरातील बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे ते म्हणाले.

तसेच शहरातील विविध वॉटर बॉडीचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात सभागृहात अहवाल वाचन करण्यात आला. यावर मोती तलावामध्ये होणाऱ्या आत्महत्या आणि त्यावर उपाययोजना म्हणून तलावाच्या कठड्याच्या बाजूने रेलिंग उभारण्याची मागणी पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली. हीच मागणी ॲड. निता कविटकर यांनी करत आत्महत्या रोखण्यासाठी योग्य त्या उपयोजना आखा असे सांगितले.

तर सभापती प्रतीक बांदेकर यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरात तलावाच्या काठावर चार लोकांच्या टीमची नियुक्ती करा असे सांगितले. मात्र, या सर्वांच्या मागणीचा विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे नगराध्यक्षांकडून सांगण्यात आले.

मात्र, नगरसेवक संजू परब यांनी तलावातील दूषित झालेल्या पाण्यावर नाराजी व्यक्त करत ड्रेनेजचे पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा, त्याचबरोबर गणपती उत्सव जवळ आल्याने विसर्जनासाठी तलावातील पाणी स्वच्छ ठेवा अशी मागणी केली.

दरम्यान, शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासंदर्भात शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक डीपीआर सर्वे व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्याबाबत सभागृहात चर्चा झाली. यावेळी मोती तलावाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आणि सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प योग्य असल्याच्या भावाना सभागृहातील सर्वच नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

यावर चर्चा होत असतानाच उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार असताना सर्वात प्रथम प्राधान्याने या प्रकल्पावर आम्ही गांभीर्याने काम केल्याचे स्पष्ट करत या प्रकल्पासाठी स्मशानभूमीच्या बाजूला जागा निश्चित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम हे एकाचवेळी प्रत्येक प्रभागातून सुरू केले जाईल असेही ते म्हणाले.