LIVE UPDATES

को.म.सा.प.च्या अभिवाचन स्पर्धेत प्रचिती बांबुळकर प्रथम

बावच्या रामेश्वर माध्यमिक विद्यालयात स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 18:40 PM
views 17  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा बाव येथील रामेश्वर माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध ललित लेखांचे प्रभावी अभिवाचन हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. या स्पर्धेत प्रचिती प्रमोद बांबुळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. 

विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित व्हावे आणि त्यांच्यामध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषद विविध साहित्यिक उपक्रम राबवत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशालेचे मुख्याध्यापक जयप्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी सहाय्यक शिक्षिका प्रिया पवार, सहाय्यक शिक्षक अनिकेत वेतुरेकर, सागर कोकरे, बाव गावच्या उपसरपंच तथा शिक्षिका सुजाता बावकर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, आम्ही बाल कवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गोसावी, कवी पांडुरंग कदम, विद्या राणे, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.

  स्पर्धेत प्रांजल पुंडलिक सोनवडेकर हिने द्वितीय, तर दुर्वा रूपेश सामंत हिने तृतीय क्रमांक मिळविला. सलोनी सुधाकर पवार हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्यांना ग्रंथभेट, प्रशस्तिपत्र आणि पेन देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांना देण्यात आलेली ग्रंथभेट सौ. स्वाती सावंत यांच्या वतीने देण्यात आली.

 अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक जयप्रकाश पवार यांनी मराठी भाषेची महती विशद करत विद्यार्थ्यांनी भविष्यातही विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.स्पर्धेचे परीक्षक म्हणून आकाशवाणीचे निवेदक व पत्रकार निलेश जोशी आणि कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेचे कोषाध्यक्ष प्रा. गोविंद पवार यांनी काम पाहिले. यावेळी निलेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना अभिवाचनासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती दिली. अभिवाचन करताना केवळ शब्दांचे उच्चार महत्त्वाचे नसून विरामचिन्हांचेही वाचन, उताऱ्यांची निवड, शब्दोच्चार हे देखील महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

 प्रा. संतोष वालावलकर यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध साहित्यिक उपक्रमांची तसेच जिल्हा मंडळाच्या साहित्य चळवळीची माहिती दिली. प्रशालेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी परिषदेच्या वतीने आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांना अभिवाचनाची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी त्यांनी ‘आपल्या ऐलाडी-पैलाडी’ या कथेचे अभिवाचन करून दाखला सादर केला.

 स्पर्धेत प्रणाली सोनवडेकर, सिद्धी परब, रिया परब, केतन मयेकर, सलोनी पवार, तन्वी पावसकर, चैताली पालव, हर्षाली कांबळी, दूर्वा माळकर, स्वरा कोचरेकर, दुर्वा सामंत, भूमी मेस्त्री, वैष्णवी सावंत, जान्हवी परब, प्रचिती बांबुळकर, कस्तुरी रावराणे, पारस पावसकर, वेदांत वेंगुर्लेकर, हर्ष परब आणि जान्हवी घोगळे यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषद, कुडाळ शाखेचे कार्यवाह सुरेश पवार यांनी केले. आभार प्रदर्शन सहकार्यवाह सौ. स्वाती सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी स्वाती सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.