
सिंधुदुर्ग : श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावचे माजी विद्यार्थी तथा उद्योगपती जी. के. सावंत यांनी विद्यालयासाठी तब्बल १ लाख रुपये किमतीचा इन्व्हर्टर भेट स्वरूपात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. शाळेच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजासाठी ही भेट अत्यंत उपयुक्त ठरणार असून, विद्युतपुरवठ्याच्या अडचणीच्या काळात विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
जी. के. सावंत यांनी ज्या विद्यालयात शिक्षण घेतले, त्या शाळेच्या गरजा लक्षात घेऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेले हे सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेशी असलेले नाते केवळ आठवणींपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष कृतीतून शाळेच्या प्रगतीत योगदान देण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल विद्यालयाच्यावतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून, ‘शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षण यांची जाणीव ठेवून समाजाला काहीतरी परत देण्याची भावना’ त्यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.
माणगाव विद्यालयाला हा महत्त्वपूर्ण इन्व्हर्टर मिळवून देण्यासाठी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव साईनाथ नार्वेकर यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यालयाच्या गरजा ओळखून त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. या मोलाच्या सहकार्याबद्दल माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगावचे पदाधिकारी व संचालक मंडळ, श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच समस्त पालकवर्गाच्या वतीने जी. के. सावंत यांचे आभार मानण्यात आलेत.











