LIVE UPDATES

तुळस मार्गे वेंगुर्ला-सावंतवाडी गाडी अचानक रद्द

विद्यार्थ्यांची गैरसोय : शिवसैनिकांनी विचारला जाब
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 20:01 PM
views 54  views

सावंतवाडी : तुळस मार्गे जाणारी वेंगुर्ला-सावंतवाडी गाडी अचानक रद्द केल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, बंटी पुरोहित यांनी सावंतवाडीच्या आगार प्रमुखांना याबाबतचा जाब विचारला. तसेच डेपोचे दुरध्वनी बंद असल्याने नाराजी व्यक्त केली. 

श्री. परब म्हणाले, अचानक बस फेरी रद्द केली गेल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. वेंगुर्ला आणि सावंतवाडी बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांत संवाद नसल्याचे दिसून आले. त्यामुळे याचा नाहक भुर्दंड प्रवाशांसह विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. तसेच सावंतवाडीहून कुडाळ-कणकवलीला जाणारी बस सहा वाजून गेले तरी आली नसून कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत एसटी प्रशासनाला त्यांनी जाब विचारला. 

यावेळी आगार प्रमुख गौतमी कुबडे म्हणाल्या, वेंगुर्ले आगारातून तुळस मार्गे येणारी गाडी अचानक रद्द केली गेली. त्यामुळे पुन्हा सायंकाळी ही बस वेंगुर्ला येथे न गेल्याने गैरसोय निर्माण झाली. त्यात आपल्याकडे वाहक, चालकांची कमतरता असल्याने ग्रामीण भागातील फेरी रद्द होणार नाही यासाठी अधिक भर दिला आहे. प्रसंगी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. सावंतवाडी बसस्थानकत ७० गाड्या असून ७९ चालक, ६३ वाहक आणि १०५ चालक-वाहक दैनंदिन प्रवासासाठी कार्यरत असून अजून चालक व वाहक अशा ५० जणांची कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.