LIVE UPDATES

विष्णूप्रसाद दळवी यांना कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अधिवेशन उत्साहात : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ग्राहक पंचप्राण पुरस्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 20:15 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे वार्षिक दोन दिवसीय राज्य अधिवेशन ८ व ९ ऑगस्ट रोजी शिवराज पॅलेस, वडगाव मावळ जिल्हा पुणे येथे संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

अधिवेशनाचे उद्घाटन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती सुरेंद्र तावडे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार सुभाष देशमुख, आमदार सुनिल शेळके व माजी मंत्री संजय भेगडे, संस्थेचे संघटक सर्जेराव जाधव, सचिव अरूण वाघमारे, सहसचिव व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुनितारीजे घाटगे व सदस्य प्रमोद कुलकर्णी, हेमंत मराठे, शामकांत पात्रीकर व प्रा. चंद्रकांत डागा आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या राज्य अधिवेशनात राज्यातील ग्राहक हितार्थ व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यामध्ये रामराव जगदाळे यांना समाजभूषण पुरस्कार तसेच अर्थव्यवस्थेचे पंचप्राण पुरस्कार अंतर्गत श्रमिक क्षेत्रात विठोबा लच्छिराम ध्यानध्यान (नाशिक), व्यापारी श्रेत्रात सुविधी जयस्वाल (नागपूर), शेतकरी क्षेत्रात पांडुरंग बरळ (पुणे), उद्योजक क्षेत्रात रयत आरोग्य मंडळ (नांदेड), ग्राहक क्षेत्रात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग-कोकण) यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. संस्थेचे सचिव अरूण वाघमारे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून ग्राहक हितार्थ केलेले कार्य व संस्थेच्या वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्य कार्यकारिणीच्या वतीने मानपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

तसेच संस्थेच्यावतीने विभागनिहाय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कोकण विभागाचा उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विष्णूप्रसाद विठ्ठल दळवी यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या अधिवेशनात विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अधिवेशनाला राज्यातील ३० जिल्ह्यातील ५२० प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, सचिव अरुण वाघमारे, संघटक सर्जेराव जाधव व सर्व राज्य कार्यकारिणी तसेच पुणे जिल्हा शाखा व पुणे महानगर कार्यकारिणी यांनी विशेष प्रयत्न केले. अधिवेशनचा समारोप अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाला.