
वेंगुर्ला : घराचे संपूर्ण बांधकाम ११ लाख रुपयांत करून देण्याचे सांगून तब्बल १० लाख ९० हजार रुपये घेतल्यानंतर बांधकाम अर्धवट ठेवून ७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना वेंगुर्ले तालुक्यातील रेडी- म्हारतळेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी तक्रारी वरून वेंगुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. २९ मार्च ते २६ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात रेडी-म्हारतळेवाडी येथील अनिल कृष्णा परुळेकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित संदीप मांजरेकर (रा. न्हावेली, ता. सावंतवाडी) आणि संशयित सदगुरू दळवी (रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) यांना ताब्यात घेतले आहे.
अनिल परुळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी क्रमांक १ याने घराचे सर्व काम ११ लाख रुपयांत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आपल्याकडून वेळोवेळी एकूण १० लाख ९० हजार रुपये घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचेच बांधकाम करून उर्वरित काम अर्धवट ठेवण्यात आले. दोघांनी मिळून आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप अनिल परुळेकर यांनी केला आहे. तसेच आरोपींनी आपल्या जुन्या घरावरील ३० पत्रे, २२ लोखंडी चॅनल तसेच तेथील १०० नारळ कोणतीही परवानगी न घेता नेल्याचे तक्रारी मध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय आरोपी क्रमांक १ याने आपल्या पत्नीला शिवीगाळ करून मारण्याची तसेच घर पाडून टाकण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, रामचंद्र माळगावकर व गजानन देसाई यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर करीत आहेत.














