LIVE UPDATES

कणकवलीत पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती

मुख्याधिकारी गौरी पाटील काय भूमिका घेणार?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 11:43 AM
views 437  views

कणकवली : कणकवली शहरातील वाहतूक आणि बाजारपेठेतील नियोजन सुरळीत करण्यासाठी नगरपंचायतीने उड्डाणपुलाखाली फळे, भाजीपाला आणि फूल विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात १० बाय १० आकाराच्या जागा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक विक्रेत्याला जागाही नेमून देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात विक्रेते या निश्चित जागांवर न बसता पुन्हा जुन्याच ठिकाणी व्यवसाय करताना दिसत असल्याने कणकवलीत पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.

२१ जुलै रोजी नगराध्यक्ष संदेश पारकर आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी उड्डाणपुलाखालील भाजीपाला व फळ विक्रेत्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींनी नगराध्यक्षांना सांगितले होते की, विक्रेते आपापसांत चर्चा करून कोण कुठे बसणार याचे नियोजन करतील आणि नगरपंचायतीने आखून दिलेल्या जागेतच व्यवसाय करतील.

मात्र, या चर्चेला आता तब्बल पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरीदेखील अनेक विक्रेते निश्चित केलेल्या जागांवर न बसता पुन्हा जुन्याच ठिकाणी व्यवसाय करत असल्याचे चित्र आहे.

२१ जुलै रोजी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचा लवाजमा घेऊन डीपी रोड ते पेट्रोल पंपापर्यंत १० बाय १०च्या जागा आखण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कारवाईनंतरही विक्रेते पूर्वीच्याच ठिकाणी बसत असतील, तर जागा आखण्याची ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच राहणार का? तसेच जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच हा उपक्रम होता का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वच्छ आणि सुंदर कणकवलीसाठी पुढाकार घेत यापूर्वी स्टॉल हटाव मोहीम राबवली होती. त्यानंतर फळे, भाजीपाला आणि फूल विक्रेत्यांसाठी पर्यायी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने नगरपंचायतीच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे आता मुख्याधिकारी गौरी पाटील या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात? निश्चित केलेल्या जागांमध्ये विक्रेत्यांना बसवण्यासाठी पुन्हा कारवाई केली जाणार का? की कणकवलीत पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थितीच कायम राहणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.