
कुडाळ : एकोणिसाव्या शतकातील मुंबईचा आकार बदलण्यात नाना शंकरशेठ यांचे नाव अग्रस्थानी आहे. मुंबईत धावणाऱ्या पहिल्या रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ आहेत, त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष राजेश पनवेलकर यांनी दैवज्ञ समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी कुडाळ येथे केले.
भारताचे थोर राष्ट्रपुरुष नाना शंकरशेठ यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही दैवज्ञ समाज कुडाळ आणि दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सायंकाळी दैवज्ञ भवन शिवाजीनगर येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तसेच समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे उद्घाटन श्री पनवेलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, महिला मंडळ संस्थापक व माजी अध्यक्ष श्रीमती श्रद्धा पाटणकर ,जिल्हा सराफ सचिव अँड संजु शिरोडकर, दैवज्ञ मंडळ कुडाळ अध्यक्ष राजू पाटणकर ,महिला मंडळ अध्यक्ष सौ स्नेहल कुडाळकर, महेश ओटवणेकर, अवधूत ओटवणेकर ,जगू कुडाळकर, संजय पिंगुळकर, जयराम डीगसकर , भाऊ पाटणकर, अनंत जामसंडेकर, नितीन हिर्लेकर, अजित डिगसकर, डॉ. विवेक पाटणकर, समाज बांधव महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी श्री पनवेलकर म्हणाले, नाना शंकरशेठ हे दानशूर, अभ्यासक व दूरदृष्टीचे नेते होते. मुंबईच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान होते. व्यापारी, समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि मुंबईचे पहिले 'बिल्डर' म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी फक्त पैसा कमावला नाही तर तो समाजासाठी खर्च केला; शिक्षण, पायाभूत सुविधा (रेल्वे) आणि राजकीय हक्क या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी केलेले काम आजही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले आहे. आधुनिक मुंबईच्या विकासाचा पाया, शिक्षणाच्या प्रसाराची चळवळ, स्त्रीशिक्षणाला दिलेले भक्कम पाठबळ, समाजहितासाठी उभारलेल्या असंख्य सार्वजनिक संस्था आणि दूरदृष्टीच्या विचारांनी भारताच्या प्रगतीला नवी दिशा देणारे युगपुरुष म्हणजे नाना जगन्नाथ शंकरशेठ असल्याचे सांगितले.
विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना ए आयचा किती प्रमाणात वापर केला पाहिजे हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाणले पाहिजे. आज मोबाईलमुळे वाचन संस्कृती दूर होत चालली आहे ती वाचन संस्कृती प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. मोबाईलमधील रिल हे विपरीत परिणाम घडवणारे आहे असे सांगितले.
काका कुडाळकर यांनी आपल्या दैवज्ञ समाजाच्या वाटचालीत नाना शंकरशेठ यांचे कार्य महान आहे. या कार्याचा आपल्याला विसर पडता कामा नये त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने एकजूट होऊन समाजाच्या प्रवाहात वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.
श्रीमती पाटणकर यांनी विद्यार्थी गौरव सोहळा आणि समाजातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला त्यांचा सत्कार निश्चितच सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. असा हा सोहळा कायमस्वरूपी चालत राहावा असे सांगितले. अँड शिरोडकर यांनी कुडाळ दैवज्ञ समाज आणि महिला मंडळ हे गेले बरीच वर्षे करत असणारा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा कौतुकास्पद आहे. प्रा. गोवेकर यांनी सुद्धा भविष्यात विद्यार्थांनी शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करताना ध्येय ठरवा त्याला दिशा देण्याचे काम पालकांनी करावे असे सांगितले तर श्री मालंडकर यांनी आपण केलेला सत्कार हा माझ्या आठवणीतील सत्कार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला नानाशंकर शेठ यांच्या कार्याचा धावता आढावा महिला मंडळाच्या सचिव श्वेता कुडाळकर यांनी घेतला. कार्यक्रमाची सुरूवात योगिता रायकर हिने गणेशस्तवन सादर करून उपस्थिताना भक्तीच्या वातावरणात नेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश ओटवणेकर यांनी मानले
मान्यवरांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी गौरव दिमाखात
या गौरव सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा सराफ संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश पनवेलकर, शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काका कुडाळकर, महिला मंडळ संस्थापिका श्रीमती श्रद्धा पाटणकर , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अवधूत मालंडकर अँड संजू शिरोडकर तसेच गायन क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या योगिता रायकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला











