LIVE UPDATES

केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू

पिंगुळी शाळा क्र. १ मधील उपक्रमाला प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 15:47 PM
views 44  views

कुडाळ : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा पिंगुळी क्र. १ येथे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करावे, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या संकल्पनेतून हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाराम सडवेलकर स्वतः उपस्थित होते.

​या प्रसंगी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वासुदेव मराठे आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची योग्य दिशा, वेळेचे नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वासुदेव मराठे यांनी नियमित अध्ययन, स्व-अभ्यास, लेखन सराव आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या सरावावर भर देण्याचे आवाहन केले, तर प्रशांत धोंड यांनी जिज्ञासू वृत्ती जोपासून संकल्पनात्मक अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते असा विश्वास व्यक्त केला.

​अध्यक्षीय भाषणात गंगाराम सडवेलकर यांनी स्पष्ट केले की, केवळ परीक्षेत यश मिळवणे हे अंतिम ध्येय नसून उत्तम व्यक्तिमत्त्व घडवणे आणि स्पर्धात्मक युगात स्वतःला सक्षम बनवणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देते, असे नमूद करत त्यांनी आयोजक शिक्षकांचे कौतुक केले. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंगुळी क्र. १ चे केंद्रप्रमुख गणेश नाईक यांनी केले. कार्यक्रमाला तेर्सेबाबर्डे क्र. १ चे केंद्रप्रमुख महेश परुळेकर, दोन्ही केंद्रांतील सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​या मार्गदर्शन वर्गांतर्गत दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी अनुभवी शिक्षकांकडून विषयनिहाय मार्गदर्शन, सराव चाचण्या, प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि शंका निरसन केले जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ पिंगुळी केंद्रातील आठ आणि तेरसेबांबर्डे केंद्रातील तीन शाळांमधील चौथीच्या ५१ व सातवीच्या २३ विद्यार्थ्यांना होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक राजाराम कविटकर यांनी केले, तर आभार केंद्रमुख्याध्यापक स्वरा काळसेकर यांनी मानले.