
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे 'ऑनर किलिंग' झाल्याची एक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका पित्याने आपली १८ वर्षीय अविवाहित मुलगी गर्भवती असल्याचे समजताच तीला चंबळ नदीत बुडवून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीची हत्या करताना पित्याने तिच्या पायांना स्पर्श केला होता असा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्ली येथे राहत असेलेली १८ वर्षीय अविवाहित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीआरवर ३१ जुलै रोजी एका मुलीची तिच्या पित्याने हत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. चौकशीवेळी २९ जुलै रोजी तरुणीच्या पित्याने जावयासह तिला औषधोपचाराच्या बहाण्याने दिल्लीहून आग्र्यातील बसौनी भागात आणले होते अशी कबुली दिल्याचे पोलिसांनी माहिती दिली.
घटनास्थळी पिता व जावयी त्या मुलीला घेऊन गेले. त्यावेळी तिला उडी मारण्यास सांगितले मात्र तिने नकार दिल्यानंतर तिला नदीत बुडवून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपी पित्याने दक्षिण दिल्लीतील टिगरी पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. आता दिल्ली आणि आग्रा पोलीस संयुक्तपणे चंबळ नदीत त्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रांनुसार, ती तरुणी १८ वर्षांची होती आणि अविवाहित असूनही कथितरीत्या गर्भवती होती. या गोष्टीमुळे कुटुंब अस्वस्थ होते. चौकशीदरम्यान, त्या पित्याने आपल्या जावयाच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे समजते. पावसामुळे, बचाव पथकाला मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहेत.













