LIVE UPDATES

मणेरी वनपरिक्षेत्रात वनविभागाची धडक कारवाई

अवैध वृक्षतोड प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा : लाखोंचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 19:27 PM
views 110  views

दोडामार्ग : मणेरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 170 मध्ये सुरू असलेल्या  मौल्यवान अशा खैर जातीच्या अवैध वृक्षतोडीवर वनविभागाने धडक कारवाई करत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. तसेच सुमारे ₹3.71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २६ रोजी पहाटे ४.३० वाजता गस्तीदरम्यान झाडे कापण्याच्या मशीनचा आवाज ऐकू आला, त्या क्षणी वन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे ३ आरोपी यां अवैध वृक्ष तोड ठिकाणी दिसून आले. यापैकी दोघे घटनास्थळावरून पसार झाले, तर पांडुरंग महादेव गावकर व श्याम नवनाथ तुळसकर (दोघेही डिचोली, गोवा) यांना ताब्यात घेण्यात आले.

कारवाईदरम्यान टाटा कंपनीचे वाहन (GA06/T2775), पॅशन प्लस दुचाकी (GA04/B-5653), इलेक्ट्रिक सायलेंट कटर, अंदाजे 38.439 घनमीटर सागवान लाकूड, तीन मोबाईल फोन आदी साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹3,71,773 असल्याचे वनविभागाने सांगितले. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, 1927 मधील संबंधित कलमान्वये मणेरी राऊंड गुन्हा क्र. C-07/2026 दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी नितेश नारायण नाईक व किसन शशिकांत गावकर (दोघेही डिचोली, गोवा) यांनाही 6 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही धाडसी कारवाई सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक वैभव बोरटे, वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी पाटील, मणेरी वनपाल तुकाराम हाके, वनरक्षक शैलेश कांबळे, शुभम वारके, वनसेवक विश्राम कुबल, जलद बचाव पथकातील बाबू वरक, जानू पटकारे, विलास खरवत यांसह वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.