
कणकवली : मुलांना नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून सुनील दामोदर धुरे (५९, कलामठ – गावडेवाडी) यांच्यासह अन्य तीन पालकांची मिळून १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात प्राप्त झाली आहे. सुनील धुरे यांच्या फिर्यादीनुसार विनिता मुंज, सुबत्ता माळी व मनोज जैन अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार सुनील यांची पत्नी सुनीता या आरोग्य सहायिका म्हणून कार्यरत असून त्यांच्यासोबत कामाला असलेली विनिता विवेक मुंज (कणकवली) हिने ऑक्टोबर २०२४ मध्ये सुनील यांना फोन केला. तुमच्या मुलांना सरकारी नोकरीला लावू शकते. त्यासाठी प्रत्येकी २४ लाख रुपये द्यावे लागतील, असे विनिता हिने सांगितले. विनिता हिने सांगितल्यानुसार सुनील धुरे यांनी सुबत्ता गिरीश माळी (रा. पुणे) यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर ६ लाख रुपये ११ डिसेंबर २०२४ रोजी पाठवले. त्यावेळी विनिता हिने सुनील यांच्या नंबरवर आवेदन फॉर्म पाठवले. तो फॉर्म सुनील यांनी भरून विनिता हिला पाठवला. त्यानंतर सुनील यांच्या मुलांना लॉगीनबाबत त्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळाले. पुढे विनिता हिच्या सांगण्यानुसार सुनील यांनी मनोज जैन यांच्या आयसीआयसीआय बँक खात्यात ३ लाख रुपये १० जानेवारी २०२५ रोजी पाठवले.
त्यानंतर मुलांना मेसेजद्वारे दिल्ली येथे वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले. त्यावेळी विनिता मुंज हिच्यासह १० मुले होती. त्यावेळी तेथे असलेल्या सुबत्ता माळी, मनोजकुमार जैन यांनी प्रत्येक मुलाकडून ५० हजार रुपये वैद्यकीय चाचणीसाठी घेतले. चाचणीनंतर मुले कणकवलीत परतली. मार्च महिन्यात मुलांना फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे नोकरी लागल्याचे पत्र पोस्टाद्वारे प्राप्त झाले. मात्र, त्याठिकाणी नोकरीमध्ये अडचणी येत असल्याने तुमच्या मुलांना मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया येथे कामाला लावते, असे विनिता हिने सुनील धुरे यांना सांगितले. तर २१ मे २०२५ रोजी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ऑफ इंडिया यांचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले.
पुढील कालावधीत विनिता हिने वेळोवेळी सुनील यांच्या पत्नीकडून ३८ लाख रुपये रक्कम सुनील यांच्या घरी येऊन रोखीने स्विकारली. ही रक्कम सुनील यांची पत्नी सुनीता हिने भविष्य निर्वाह निधीतून १० लाख, जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्था ओरोस येथून कर्ज स्वरुपात ३० लाख, आरडी व बचत मिळून ८ लाख असे ४८ लाख रुपये आतापर्यंत विनिता हिला दिले. सर्व ४८ लाख रुपये देऊन झाल्यानंतर सुनील यांनी विनिता हिच्या सांगण्यावरून आपल्या मुलांना चार - पाच वेळा दिल्लीला पाठवले. परंतू मुलांना नोकरी मिळू शकली नाही. पुढे विनिता हिच्या सांगण्यावरून इतर मुलांसोबत सुनील यांनी आपल्या मुलांना परत दिल्लीला पाठवे. परंतू तेथेही कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग होत नसल्याने मुले परत आली.
सुनील यांनी एक महिन्याची वाट पाहिली. पण, विनिता हिने त्यांना फोन न केल्याने सुनील यांनी विनिता हिला घरी जाऊन विचारणा केली. त्यावेळी विनिता हिने १४ फेब्रुवारी २०२६ रोजीं त्यांच्या खात्यातून एक लाख तर गौरव याने ४ जून २०२६ रोजी रोख ५० हजार व यूपीआयद्वारे ५० हजार असे एक लााख रुपये पाठवले. अर्थान सुनील व त्यांची पत्नी यांनी विनिता व अन्य संशयितांना पाठवलेल्या ४८ लाखांपैकी २ लाख रुपये परत मिळाले. तर विनिता मुंज, सुबत्ता माळी, मनोज जैन यांनी अन्य तीन पालकांचीही फसवणुक केली आहे. यात दळवी नामक एकाकडून १९ लाख आरटीजीएस व १४ लाख रोख असे २४ लाख, नाईक नामक एकाकडून ९ लाख आरटीजीएस व १५ लाख रोख मिळून २४ लाख, मसके नामक एकाकडून रोख स्वरुपात २४ लाख रुपये घेतले असल्याचेही सुनील धुरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरील तीन पालकांची तीन मुले व धुरे यांची दोन मुले यांचे मिळून १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक वरील संशयितांनी केल्याचे धुरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.












