
देवगड : देवगड तालुक्यातील पोयरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेदरम्यान ५९ वर्षीय महिलेला मारहाण केल्याच्या कथित प्रकरणात देवगड न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. विद्यमान सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य, माजी सरपंच यांच्यासह अन्य संशयितांविरोधात एफआयआर दाखल करून तपास करण्याचे निर्देश न्यायालयाने देवगड पोलिसांना दिले आहेत.
२१ मे २०२६ रोजी पोयरे ग्रामपंचायतीच्या नियोजित ग्रामसभेदरम्यान एका ५९ वर्षीय महिलेला मारहाण, सार्वजनिक ठिकाणी विनयभंग, शिवीगाळ आणि दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संबंधित महिलेने देवगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद केली होती.
गंभीर स्वरूपाचे आरोप असूनही नियमित एफआयआर दाखल न झाल्याने पीडित महिलेने न्यायालयात धाव घेतली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १७३ व १७५ (३) अंतर्गत तिने न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या अर्जावरील सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आणि पोलिसांनी अर्जाला घेतलेले आक्षेप न्यायालयाने फेटाळून लावले. प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मारहाण, विनयभंगासदृश कृत्य, शिवीगाळ आणि दागिने हिसकावून घेण्यासारखे दखलपात्र गुन्हे घडल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणात सखोल पोलीस तपास आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने संबंधित संशयितांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे पोयरे ग्रामसभेतील महिला मारहाण प्रकरणाचा पुढील तपास सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








