
सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणेंनी मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकत घेतलेल्या भूमीकेनंतर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले होते. मात्र, काही महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा या अवैध धंद्यानी डोकं वर काढलं. मात्र, आज शिवसेना आमदार निलेश राणे यांनी थेट जिल्हा पोलिसांची पोलखोल करत पोलिस अधीक्षकांवरच आरोप केलेत. अवैध धंद्यामागे असणाऱ्या 'खाकी' चा पुराव्यानिशी त्यांनी पर्दाफाश केला. जिल्ह्यात दोन दिवस आधीच खुलेआम सुरू असणारे अवैध धंदे बंद झाले. दोन दिवसांपूर्वी निलेश राणेंनी दिलेला इशारा याला कारणीभूत ठरला. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर 'खाकी'तील भस्मासुरांसह अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमीकेनंतर अनेक अवैध धंदेवाईक सिंधुदुर्गच्या सीमा ओलांडून गेलेत. काहींनी गोवा बॉर्डर पसंत केली तर काहींनी खारेपाटण बॉर्डरच्या बाहेर राहणं पसंत केलं. पालकमंत्र्यांच्या या भूमीकेनंतर जिल्ह्यातील अवैध धंदे बरेच महिने बंद होते. मात्र, कालांतराने खाकीच्या आशीर्वादानेच अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोकं वर काढलं, आज त्याला आमदार राणेंनी पुष्टी दिली. खाकीची मिळाणारी साथच त्यांना प्रोत्साहन देणारी ठरली. यात खाकीतील काहींनी आपले हप्ते दुप्पट करून घेतले तर केसीस न टाकण्यासाठी, नाव बदलण्यासाठी लाखो रूपये देखील जिल्ह्यातील काही अवैध व्यावसायिकांकडून लाटले. शिवसेना आमदार निलेश राणेंनी ट्वीट करत इशारा देताच खाकीतील 'हप्ते' खोर सावध झाले. दोन दिवसांपूर्वीच अवैध धंदेवाईकांना त्यांनी सावध केले. खुलेआम सुरू असणारे धंदे बंद करण्याचा सल्लाच 'खाकी'तील हप्तेखोरांनी दिला. यानंतर काहींनी थाटलेले खुलेआम अवैध धंदे बंद झाले. यातच आज सकाळी या सगळ्याचीच भांडाफोड आमदार श्री. राणेंनी केली. दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षकांच्या कारभाराचाच पंचनामा त्यांनी केला. एवढंच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या या मोठ्या बंधूंने 'स्टींग ऑपरेशन'चाही इशारा दिला. पालकमंत्री नितेश राणेंनी मटका बुकीवर टाकलेली धाड आठवली तर आजही पोलिस खातं हडबडून जात. त्यामुळे निलेश राणेंच्या या इशाऱ्यानंतर अवैध धंदेवाईकांसह त्यांच्याकडून चिरीमिरी घेणाऱ्या 'खाकी'चेही धाबे दणाणले आहेत. यातील काही व्यावसायिक तर सत्ताधारी पक्षांचेच कार्यकर्ते आहेत. मात्र, आज जिल्ह्यातील अनेक खुलेआम चालणारे अवैध धंदे बंद झाल्याचे चित्र पहायला मिळत असून याला आम. राणेंची प्रेस कारणीभूत ठरली आहे.
गांजा, बनावट दारू, जुगार, मटका आदींसह अवैध धंद्यातून सिंधुदुर्ग जिल्हा बाहेर पडावा, इथला तरूण चांगल्या मार्गाला लागावा ही भावना राणे बंधुंची आहे. त्यादृष्टीने दोघांनी घेतलेल्या भूमिकेच कौतुक देखील होत आहे. मात्र, खुलेआम चालणारे हे अवैध धंदे बंद झाले असले तरी चोरी छुप्या मार्गाने ते सुरूच आहेत. 'खाकी'तील हप्तेखोरांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. म्हणूनच एवढी हिंमत ते करत आहेत. त्यामुळे बंद झालेले हे खुलेआम चालणारे अवैध धंदे काही काळानंतर पुन्हा तर डोकं वर काढणार नाहीत ना ? ही शंका आहे. कारण, खाकीतील 'हप्ते' खाणारे कुंपण त्याला जबाबदार आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या आजच्या स्फोटक पत्रकार परिषदेतून ते सिद्ध देखील झालं आहे. आजच्या या पत्रकार परिषदेमुळे पोलिस खातही बदनाम झालेल आहे. मात्र, काही जणांच्या हप्तेखोरीमुळे प्रामाणिक पोलिस देखील यात भरडला गेला आहे. त्यामुळे हा प्रामाणिक पोलिस अधिकारी, कर्मचारी अवैध धंद्याचा नायनाट करण्यासाठी पुढाकार घेणार का ? प्रशासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर जनकल्याणासाठी करणा का ? हे येत्या काळात पहायला मिळणार आहे.














