
आचरा : गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील सुमारे २,४०० महिला सभासदांना ना नफा, ना तोटा तत्त्वावर कडधान्याचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सलग १४व्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात आला असून, किनारपट्टी भागातील मत्स्यव्यावसायिक महिलांना सणाच्या काळात आधार देण्याचा संस्थेचा प्रयत्न यंदाही कायम राहिला.
आचरा विभागातील कडधान्य वाटप कार्यक्रमावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, संस्थापक तथा गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सौ. गौरी सारंग, श्रीमती सुमाली चोपडेकर, सौ. रंजना खराडे, श्री. आदित्य केरकर यांच्यासह मोठ्या संख्येने मत्स्यव्यावसायिक महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अध्यक्षा स्नेहा केरकर यांनी सांगितले की, संस्थेच्या स्थापनेपासून गेली १४ वर्षे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गोरगरीब मत्स्यव्यावसायिक महिलांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यंदा प्रत्येक महिला सभासदाला पावटे, मूगडाळ, चणाडाळ, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, चणे, चवळी, गूळ, रवा व गोडेतेल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कर्ली, पाट, परुळे, केळूस, देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा आदी किनारपट्टी भागातील सुमारे २,४०० महिला सभासदांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर आणि त्यांच्या सहकारी सभासदांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. गेल्या १४ वर्षांत मत्स्यव्यावसायिक महिलांच्या व्यवसायातील अडचणी सोडविणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, मासे विक्रीच्या ठिकाणी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांसह आवश्यक सुविधा निर्माण करणे, मच्छीमार मार्केट उभारणी तसेच मच्छीमारांच्या घरांची नावे करण्यासाठी संस्थेने सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी मालवण, देवगड व वेंगुर्ला येथे मोर्चे व आंदोलने करण्यात आली. मत्स्य दुष्काळाच्या काळात शासनाकडून मिळणारे ६ हजार रुपयांचे अनुदान महिला मत्स्यव्यावसायिकांना मिळावे यासाठी धरणे आंदोलन व आक्रोश मोर्चा काढून सुमारे १,५०० महिलांना न्याय मिळवून देण्यात संस्थेला यश आले, असे उपरकर यांनी सांगितले.
तसेच मत्स्य विभागाच्या मत्स्यसंपदा योजनेतून ७५ टक्के अनुदानावर सुमारे ५० महिलांना ई-स्कूटर उपलब्ध करून देत घरपोच मासे विक्रीसाठी रोजगाराची संधी निर्माण करून देण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू मत्स्यव्यावसायिक महिलांना मिळवून देण्यासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शासनाच्या मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या ५ हजार रुपयांच्या अपघाती विमा योजनेचा मत्स्यव्यावसायिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. गणेश चतुर्थीनंतर मत्स्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील महिलांची विमा योजनेसाठी नोंदणी करण्यात येणार असून, इच्छुक महिलांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.










