LIVE UPDATES

कोनशी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गणेशमूर्ती शाळेला भेट

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 20:29 PM
views 18  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण कृष्णा गवस (आप्पा) यांच्या गणेशमूर्ती निर्मिती रंगशाळेला भेट देत मूर्तीकलेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या शैक्षणिक भेटीत विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते रंगकाम व सजावटीपर्यंतची विविध प्रक्रिया जवळून पाहिली.

रंगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या विविध आकारांच्या व आकर्षक गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी पाहिल्या. मूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माती, मूर्तीला आकार देण्याची पद्धत, बारकावे, रंगकाम तसेच मूर्तीला अंतिम रूप देण्याची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.

कलाकारांकडून मूर्ती निर्मितीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहताना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कला, हस्तकौशल्य, सर्जनशीलता, निरीक्षण व स्थानिक पारंपरिक व्यवसायाचे महत्त्व यांची प्रत्यक्ष जाणीव झाली. गणेशमूर्ती निर्मितीमागील कलाकारांची मेहनत आणि कौशल्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मातीच्या मूर्तींचे महत्त्वही विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रमामुळे ‘पुस्तकाबाहेरील शिक्षण’ आणि अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना मिळून स्थानिक कला व संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध निर्माण झाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी श्री लक्ष्मण कृष्णा गवस (आप्पा) व त्यांचे कुटुंबियांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

या कार्यशाळेत मिळालेल्या प्रत्यक्ष ज्ञानाधारित अनुभवांचे दैनंदिन जीवनात उपयोजन पडताळणीसाठी व विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी कोनशी शाळा ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती ’ कार्यक्रमाचे आयोजित करणार आहे. गणेशमूर्ती निर्मिती रंगशाळा भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौरभ सिद्धये, उपाध्यक्ष सिद्धेश गवस, मुख्याध्यापक बाबुराव पास्ते, पदवीधर शिक्षक डॅा. राजेंद्र चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.