LIVE UPDATES

'राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६' तालुकास्तरीय स्पर्धेचे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 20:34 PM
views 18  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावर आधारित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ही तालुकास्तरीय स्पर्धा स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक रुजूल पाटणकर हे होते. तसेच कार्यक्रमाला गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर हे अतिथी म्हणून लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पी. जी. काकतकर, सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, कोलगावचे केंद्रप्रमुख संदीप निऊंगरे, विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा गावडे, सावंतवाडी बीआरसीच्या प्रतिभा सातार्डेकर व प्रसाद सांगेलकर तसेच आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी बांदा पानवळ कॉलेजचे एन. डी. कार्वेकर, यशवंतराव भोसले कॉलेज, चाराठेचे प्राध्यापक अमर प्रभू व राणी पार्वती देवी हायस्कूलचे प्राध्यापक मिलिंद कासार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांचे नाट्यसादरीकरण सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रशालेचे संचालक रुजुल पाटणकर तसेच गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना नाट्य अभिनयासाठी प्रेरणा दिली. तसेच सर्व संघाना स्पर्धेचे नियम समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका अमृता सावंत व चैताली वेर्लेकर यांनी केले. या कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील एकूण आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या व आत्मविश्वासाने नाट्यसादरीकरण केले. बांदा पानवळ कॉलेजचे एन. डी. कार्वेकर, यशवंतराव भोसले कॉलेज, चाराठेचे प्राध्यापक अमर प्रभू व राणी पार्वती देवी हायस्कूलचे प्राध्यापक मिलिंद कासार या परीक्षकांनी चौकस विचार करून आपल्या निरीक्षणाद्वारे खालील निकाल जाहीर केला. त्यापैकी मळगाव इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक, मदर क्विन्स इंग्लिश हायस्कूलने द्वितीय क्रमांक व कळसुलकर हायस्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही संघांच्या विद्यार्थ्यांना त्या-त्या क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांकाने नाट्यात विजयी विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय आणि त्यानंतर विजयी झाल्यास विभागस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल, असे उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच इतर सहभागी शाळांच्या विद्यार्थी संघांना सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यानंतर उपस्थित परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नाट्य करणे व पथनाट्य करणे यातील फरक समजावून सांगितला. तसेच नाट्य सादरीकरण करताना कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उपस्थित पाहुण्यांनी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे संचालक रुजुल पाटणकर यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, शाळेच्या पर्यवेक्षिका निधी सावंत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपस्थित सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांमुळे सुरळीत व उत्तमरित्या पार पडल्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानले.

या कार्यक्रमाचे समन्वयन प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका कु. दीपिका कोरे व शाळेच्या समन्वयक सुषमा पालव यांनी केले. अशाप्रकारे विज्ञान, समाज, कला आणि नाट्य यांचा सुंदर संगम घडविणारी ‘विज्ञान आणि समाज’ या विषयावरील राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ ची तालुकास्तरीय स्पर्धा स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.