
सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे ८ सप्टेंबर २०२६ रोजी ६०वा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेचे महत्त्व, वाचनाची आवड आणि शिक्षणातून व्यक्ती व समाजाच्या विकासाची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम घेण्यात आला.
यंदाचा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन “Literacy for people, the planet and prosperity” अर्थात “लोक, पृथ्वी आणि समृद्धीसाठी साक्षरता” या संकल्पनेवर आधारित आहे. यूनेस्कोच्या माहितीनुसार २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा ६०वा वर्धापनदिन साजरा होत असून, साक्षरता ही मानवी हक्कांची पायाभूत गरज तसेच शांततामय व शाश्वत समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे.
कोनशी शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या निमित्ताने एकत्र येत “साक्षरता म्हणजे केवळ वाचन-लेखन नव्हे, तर ज्ञान, विचार, मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्वाची वाटचाल” हा संदेश अधोरेखित केला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
साक्षरतेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ज्ञानाची दारे खुली होतात. त्यामुळे “प्रत्येक मूल शिकले पाहिजे, प्रत्येक व्यक्ती साक्षर झाली पाहिजे आणि शिक्षणातून समाज अधिक सक्षम झाला पाहिजे” या विचाराची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे साजरा झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जाणिवांना चालना देणारा आणि साक्षरतेसोबतच वाचन, चिंतन व ज्ञाननिर्मितीची संस्कृती जोपासणारा ठरला. तांबुळी केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक बाबुराव पास्ते व पदवीधर शिक्षक डॅा. राजेंद्र चव्हाण यांच्या नियोजनाखाली हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन उत्साहात पार पडला.










