LIVE UPDATES

नकारानंतरही महिलेचा पाठलाग ; तरुणाला कारावासाची शिक्षा

२५ हजारांचा दंड न भरल्यास आणखी आठ दिवस साधी कैद
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 09, 2026 11:15 AM
views 36  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गगरी  : महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तिचा पाठलाग करून वाहनातून सोडण्याची वारंवार विचारणा करणाऱ्या संकेत मिलिंद महेंद्रकर (वय २६, रा. कलमठ सुतारवाडी, ता. कणकवली) याला मुख्य न्याय दंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी एक महिना सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी आठ दिवस साधी कैद भोगावी लागणार आहे.  

 फिर्यादी महिला आपले नित्याचे काम आटोपून घरी जात असताना आरोपी वाहनातून तिच्याजवळ आला. त्याने ‘ओरोस फाटा येथे सोडू का?’ अशी विचारणा केली. महिलेने स्पष्ट नकार दिल्यानंतरही आरोपीने पुन्हा-पुन्हा त्याच प्रकारे विचारणा करत तिचा पाठलाग केला. या प्रकारामुळे महिलेने ७ सप्टेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

   या प्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र दळवी यांनी केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. शिल्पा गोबाडे आणि ॲड. गुरुदास माजगावकर यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. ॲड. शिल्पा गोबाडे यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान पैरवी अंमलदार महिला पोलीस शिपाई शिंदे यांनी सहकार्य केले.