
देवगड :महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. देवगडसमोरील समुद्रात कर्नाटकातील मलप्पे बंदराची ‘हनुमा ध्याना’ ही हायस्पीड ट्रॉलर नौका पकडून जप्त करण्यात आली. गेल्या १५ दिवसांतील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई असून, या कारवाईमुळे स्थानिक मच्छिमारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
१८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला आचरा समोरील समुद्रात सुमारे ९ ते १० नॉटिकल मैल अंतरावर ही नौका वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच संबंधित नौकेने वेगाने पळ काढला. मात्र, अधिकाऱ्यांनी पाठलाग सुरू ठेवत देवगडसमोरील समुद्रात या नौकेला पकडले. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ मधील तरतुदींनुसार नौका ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. त्यानंतर नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, तिच्याविरोधात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या नौकेचे नाव ‘हनुमा ध्याना’ असून, तिचा नोंदणी क्रमांक IND-KA-02-MM-6013 आहे. सुनील शेखर कोट्यान (रा. उडुपी, कर्नाटक) हे या नौकेचे मालक आहेत. या कारवाईचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर नौकांकडून स्थानिक मच्छिमारांची जाळी तोडली जात असल्याच्या तक्रारी मालवण व देवगड परिसरातील मच्छिमारांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. कर्नाटकातील मलप्पे बंदरातील नौका अधिक अश्वशक्तीच्या असल्याने त्यांचा पाठलाग करणे आव्हानात्मक ठरत असतानाही विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी परप्रांतीय नौकांच्या घुसखोरीविरोधात सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे विभागाच्या कारवाईला बळ मिळत असून, स्थानिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अंमलबजावणी अधिकारी प्रतिक महाडवाला यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
रात्रीच्या अंधारात भर समुद्रात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडणे हे आव्हानात्मक काम असतानाही मत्स्यव्यवसाय विभागाने १५ दिवसांत दुसऱ्यांदा अशी कारवाई केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात विभागाची मोहीम अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








