LIVE UPDATES

धूप-कापूर, मोर अन् कोंबड्याचं गूढ! कोकणात धुमाकूळ घालतोय ‘महामारी विशुचिका’ नाट्यप्रयोग

Mahamari Vishuchika Dashavatar Natak : सागरी वाऱ्यांच्या साक्षीनं फुलणाऱ्या आणि कलाप्रेमींच्या काळजात घर करणाऱ्या कोकणभूमीत, दशावतार आणि लोककलेचा वारसा नेहमीच परंपरेच्या सोनेरी पानांवर कोरलेला राहिला आहे. याच मातीत आता एका नव्या आणि क्रांतीकारी नाट्यप्रयोगाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शिवपुराण आणि विष्णू पुराणातील दिव्य पुरावे अन् आजच्या महामारीच्या वास्तवाचा आरसा दाखवणारी ‘महामारी विशुचिका’ ही कलाकृती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दैवी परंपरा, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि निसर्गाशी छेडछाड केल्यावर उद्भवणारे संकट यावर प्रकाश टाकणारा हा नाट्यप्रयोग कोकणच्या सांस्कृतिक पटलावर एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरत आहे.
Edited by: स्‍वप्‍नील परब
Published on: November 18, 2026 12:19 PM
views 70  views
Mahamari Vishuchika Dashavatar Natak by Balakrishna Gore Natya Mandal

सिंधुदुर्ग/स्‍वप्‍नील परब : पारंपरिक दशावतार नाट्यसंस्कृतीत नवनवीन प्रयोग करत बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजप्रबोधनात्मक पाऊल उचलले आहे. म्हापणचे सुपूत्र बाळा राऊळ यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेले आणि मिनी ट्रिक्सिनियुक्त तंत्रज्ञानावर आधारित ‘महामारी विशुचिका’ हा नाट्यप्रयोग सध्या संपूर्ण कोकणात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

कोरोनाकाळापासून सुरू झालेल्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर, या संकटाचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. मदिरापान आणि समाजातील इतर व्यसनांमुळे मानवी जीवन कसे विस्कळीत होते, याचे विदारक पण डोळ्यात अंजन घालणारे सत्य यात मांडण्यात आले आहे.

आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे सिद्धेश मुणगेकर यांनी या नाटकात साकारलेली भूमिका अत्यंत लक्षवेधी ठरत असून, प्रेक्षकांची मते त्यांनी जिंकून घेतली आहेत. या नाट्यप्रयोगातील सर्वात मोठे व अनोखे आकर्षण म्हणजे मोर आणि कोंबड्याचे सादर होणारे चित्तथरारक नृत्य. या दोन्ही पक्ष्यांचे आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे, यावर कथानकात प्रकाश टाकण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीत आणि विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या धूप व कापराचे आरोग्याच्या व वातावरणाच्या शुद्धीकरणातील महत्त्व अत्यंत प्रभावी संवादांतून व दृश्यांतून उलगडून दाखवण्यात आले आहे. शिवपुराण आणि विष्णू पुराणातील दाखले देत, आजच्या काळात पर्यावरणाचा झालेला -हास आणि महामारीचा प्रादुर्भाव यांचा परस्परसंबंध अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने मांडण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य मेळ घालून रंगमंचावर साकारण्यात आलेले विविध ट्रिक्स (प्रयोगात्मक युक्त्या) प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. 

कंपनीचे मालक बाळकृष्ण नारायण गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगळ्यावेगळ्या प्रयोगाला कोकणातील रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आतापर्यंत या नाटकाचे ४० यशस्वी प्रयोग पार पडले असून, प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

पारंपरिक कलेला आधुनिकतेची आणि समाजप्रबोधनाची जोड कशी द्यावी, याचे उत्तम उदाहरण म्हणून ‘महामारी विशुचिका’ या नाटकाकडे पाहिले जात आहे. कोकणच्या नाट्यविश्वात एक नवा इतिहास रचत असलेला हा प्रयोग पाहण्यासाठी रसिकांची पावले आपोआपच रंगमंचाकडे वळत आहेत.

नाटकाची विशेष आकर्षणे

१) मोर आणि कोंबड्याचे चित्तथरारक आणि सुंदर नृत्य.

२) मोर, कोंबडा, धूप आणि कापूर यांचे आध्यात्मिक, धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व उलगडणारे कथानक.

३) प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे मिनी ट्रिक्सिन्युक्त (अनोख्या रंगमंचीय युक्त्या) सादरीकरण.