LIVE UPDATES

Kankavli Crime News : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर संशयितास अटक

मुलगी गर्भवती आहे का? याचा बुधवारी मिळणार वैद्यकीय अहवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 17, 2026 08:00 PM
views 422  views
Kankavli Police Arrest Accused in Minor Girl POCSO Sexual Assault Case

कणकवली : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अखेर कणकवली पोलिसांनी संशयित महेंद्र उर्फ मयू गणपत घाडीगावकर (३९, रा. किर्लोस, ता. मालवण) याला मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली. संशयिताला बुधवारी ओरोस येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पिडित मुलगी गर्भवती आहे की नाही याचा वैद्यकीय अहवाल बुधवारी प्राप्त होणार असल्याची माहिती घटनेच्या तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी दिली. 

पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार ही घटना जुलै ते ५ नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. पिडीत मुलगी व संशयित आरोपी महेंद्र यांची ओळख 'इंस्टाग्राम'वर झाली. आरोपीने आपले वय कमी असल्याचे खोटे सांगत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने अनेकदा ओसरगाव येथील जंगलमय भागात नेऊन लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान सदरची मुलगी गर्भवती असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना आला. त्यानंतर कुटुंबीयांनी चौकशी केली असता सदरची बाब उघड झाली. अखेरीस कुटुंबीयांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. 

संशयित आरोपी विरोधात बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा (पोक्सो) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरची मुलगी गर्भवती असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र याबाबतचा वैद्यकीय अहवाल बुधवारी येणार असल्याची माहिती वृषाली बरगे यांनी दिली.