
देवगड : घरगुती वादातून नाद धनगरवाडी येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व त्यांच्या मुलाला मारहाण करून धमकी दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामचंद्र बाबाजी शिंदे (वय ५०) यांच्या फिर्यादीनुसार संजय धोंडू शिंदे (वय २९, रा. नाद धनगरवाडी) व संजय विठ्ठल वरक (वय २७, रा. गवाणे धनगरवाडी) या दोघा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र शिंदे हे २२ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुलगा आशिष याच्यासमवेत घराबाहेर तुळशी विवाहाची तयारी करीत होते. यावेळी तेथे आलेल्या संशयित संजय शिंदे याने घरगुती वादातून रामचंद्र शिंदे यांच्या हातापायांवर चिव्याच्या दांड्याने मारहाण करून त्यांना दुखापत केली. तर संशयित संजय वरक याने आशिष याच्या डाव्या पायावर चिव्याच्या दांड्याने मारून त्याला जखमी केले.
हा प्रकार सुरू असताना रामचंद्र शिंदे यांची पत्नी रंजना तेथे आल्या असता संशयित संजय शिंदे याने त्यांच्याही डोक्यावर चिव्याच्या दांड्याने मारहाण करून दुखापत केली. यानंतर दोन्ही संशयितांनी आशिष याला 'तुझा एक पाय मोडला, दुसरा पाय मोडेन', अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी रामचंद्र शिंदे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








