
सावंतवाडी : येथील बाहेरचावाडा परिसरात घरगुती वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या मारामारीच्या घटनेत डोक्यावर वार केल्याने समीर नझीर बेग हे गंभीर जखमी झाले. तर या झटापटीत त्यांचा लहान भाऊ इम्रान नझीर बेग हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन्ही भावांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दिली. यावरून पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही मारहाणीची घटना पाहिल्यानंतर घरी परतलेली त्यांची एक नातेवाईक वृद्ध महिला चक्कर येऊन खाली पडली. तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बेग कुटुंबातील या दोन सख्ख्या भावांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून घरगुती वाद सुरू असून यापूर्वीही त्यांच्यात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या.
हा कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी दोन्ही भावांना आणि कुटुंबीयांना समोरासमोर बसवून अनेकदा समजूत घालण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही हा वाद शमला नाही. अखेरीस त्याचे पर्यवसन रक्तरंजित हाणामारीत झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








