
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा वेळेत आणि प्रभावीपणे विनियोग होणे आवश्यक आहे. भौतिक कामांची प्रगती आणि आर्थिक नियोजन यांचा समन्वय राखून निधी खर्चाचा वेग वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधवले, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आणि निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या कामांची सद्यस्थिती, प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, प्रत्यक्ष खर्च तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
कामे प्रत्यक्षात पूर्ण होत असताना त्यानुसार आर्थिक खर्चाची प्रक्रियाही वेळेत पूर्ण झाली पाहिजे. विशेषतः बांधकाम विभागाने पूर्ण केलेल्या कामांचे मोजमाप पुस्तक (एम.बी. रेकॉर्डिंग) वेळेत पूर्ण करावे. यामुळे संबंधित कामांची देयके अदा करणे आणि निधी विनियोगाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे शक्य होईल. केवळ भौतिक प्रगती दाखवून चालणार नाही, तर त्यासोबत आर्थिक प्रगतीही साध्य झाली पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
नगरविकास विभागांतर्गत मंजूर कामांना गती देऊन ती निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच सर्व विभागांनी आपल्या कामांचा तपशील आणि निधी खर्चाची माहिती डॅशबोर्डवर नियमितपणे अद्ययावत करावी. अद्ययावत माहितीमुळे कामांच्या प्रगतीवर प्रभावी संनियंत्रण ठेवता येते. तसेच जिल्ह्यातील विकासकामांची सद्यस्थिती आणि झालेला खर्च याची माहिती पालकमंत्र्यांनाही दररोज उपलब्ध होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
सर्व खातेप्रमुखांनी आपापल्या विभागातील मंजूर कामांचा नियमित आढावा घ्यावा. अधिनस्त यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन प्रशासकीय मान्यता, कामांची अंमलबजावणी, मोजमाप नोंदी आणि निधी खर्च याबाबतच्या प्रक्रिया प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. उपलब्ध निधी वेळेत खर्च होण्याबरोबरच मंजूर कामांचा दर्जा आणि त्यातून अपेक्षित विकास साध्य होण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी दिले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








