
सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याने आलेल्या मानसिक तणावातून एका २५ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माडखोल धवडकी बेबीवाडी येथे घडली होती. या प्रकरणी सनिकेत सतीश पाटील (वय २६, रा. कापूरखेड, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने माडखोल धवडकी बेबीवाडी येथील भाड्याच्या घरात १६ ऑगस्ट २०२६ रोजी सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी संनिकेत पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले होते. मात्र, जेव्हा तिने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. या मानसिक तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे.
आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात स्वतःवर जबाबदारी येऊ नये म्हणून आरोपीने कोणालाही न सांगता तिला गळफासावरून एकट्याने खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक करत असून आरोपीच्या अटकेची तजवीज सुरू आहे.













