LIVE UPDATES

कुणकेश्वर ‘ताज’ हॉटेलच्या घोषणेने देवगडमध्ये जल्लोष

मांजरेकर नाका येथे भाजपकडून घोषणा देत प्रकल्पाचे स्वागत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 18:40 PM
views 79  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या कुणकेश्वर येथे ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा होताच देवगडमध्ये भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त जल्लोष करत या प्रकल्पाचे स्वागत केले. देवगड शहरातील मांजरेकर नाका येथे घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कुणकेश्वर येथे ५० खोल्यांचे हे आलिशान हॉटेल उभारण्यात येणार असून, प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे देवगड तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. स्थानिक व्यावसायिक, वाहतूक, हॉटेल व्यवसाय तसेच पर्यटनाशी निगडित विविध व्यवसायांनाही याचा लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम, योगेश चांदोस्कर, भाजपा शहराध्यक्ष वैभव, करंगुटकर ,देवगड नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेवक शरद ठुकरूल, दयानंद पाटील, रोहन खेडेकर,, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नरेश डामरी, गणपत गावकर, उमेश कनेरकर, अनिल कोरगावकर, व्ही. सी. खडपकर, सुभाष धुरी, उष:कला केळुसकर, ज्ञानेश्वर खवळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

‘ताज’मुळे देवगडचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर झळकणार : संदीप साटम

कुणकेश्वरसारख्या निसर्गरम्य आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी ‘Tree of Life’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी होत असल्याने देवगडच्या पर्यटन विकासाला नवी उंची प्राप्त होणार आहे. या प्रकल्पामुळे देवगडचे नाव आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून देवगड तालुक्यात विविध विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत असून, देवगडला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सातत्याने सुरू आहे. कुणकेश्वर येथे ‘ताज’सारख्या जागतिक दर्जाच्या ब्रँडचा प्रकल्प येणे ही देवगडच्या पर्यटन क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे, असे साटम यांनी सांगितले.

कुणकेश्वरचा समुद्रकिनारा, श्री क्षेत्र कुणकेश्वरचे धार्मिक महत्त्व आणि कोकणचे निसर्गसौंदर्य यांना आता जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांची जोड मिळणार आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मोठी मदत होईल. त्याचबरोबर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि हॉटेल, वाहतूक, खानावळ, स्थानिक उत्पादने, हस्तकला तसेच विविध सेवा व्यवसायांना चालना मिळेल.

‘ताज’ हॉटेल हा केवळ पर्यटन प्रकल्प नसून देवगडच्या आर्थिक, सामाजिक आणि रोजगाराच्या विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे देवगडच्या विकासाला मिळालेली ही नवी दिशा भविष्यात तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल,’ असा विश्वासही संदीप साटम यांनी व्यक्त केला.