
दोडामार्ग : शासकीय नुकसानभरपाई आणि विविध अनुदानाच्या लाभासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया गेल्या दहा-बारा दिवसांपासून ठप्प असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे. तांत्रिक बिघाडाचा फटका पात्र लाभार्थ्यांना बसत असून, ई-केवायसीच्या कारणास्तव शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून दूर ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबू गवस आणि जिल्हा चिटणीस बाळा धाऊस्कर यांनी केली आहे.
शासकीय योजनांतर्गत नुकसानभरपाई अथवा अनुदान मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित प्रणाली कार्यरत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सेवा केंद्रे तसेच संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये जाऊनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीतही अनेक शेतकरी ई-केवायसीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, ऑनलाइन प्रणालीच बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई किंवा अनुदानाची रक्कम अडकण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ज्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून नुकसानभरपाई अथवा अनुदानाची रक्कम जमा केली जाते, त्या खातेदारांची ओळख आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित बँकांकडे उपलब्ध असते. त्यामुळे पुन्हा स्वतंत्रपणे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह न धरता बँकेकडील उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे लाभ देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना गवस आणि धाऊस्कर यांनी केली आहे.
ई-केवायसी प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत शासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. तसेच, प्रणाली बंद असण्याचा फटका पात्र शेतकऱ्यांना बसू नये यासाठी ई-केवायसीची अट तात्पुरती शिथिल करून नुकसानभरपाई व अनुदानाचे वितरण सुरळीत करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.










