LIVE UPDATES

वैभववाडीत पावसाची संततधार

विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार बरसला;भातशेतीला दिलासा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 17:48 PM
views 53  views
#kokansadlive#news update#konkan update#

वैभववाडी : गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सायंकाळपासून  तालुक्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत असून, काही ठिकाणी संततधार सुरू आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून, पावसाच्या पुनरागमनाने बळीराजाही सुखावला आहे.

 गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. त्यामुळे वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झाली होती. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दुसरीकडे, पावसाअभावी शेतकरीही चिंतेत होते.यंदाच्या भातशेतीच्या हंगामात बीजधारणेच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. 

पावसाच्या खंडामुळे भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी पुन्हा पावसाच्या प्रतीक्षेत होते.अखेर मंगळवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आणि पावसाने जोर धरला. शहरासह ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू होती.पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. भातशेतीला या पावसाचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तालुक्यातील वातावरणही बदलले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.अचानक आलेल्या पावसामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची काही प्रमाणात धांदल उडाली होती.