LIVE UPDATES

प्रधानमंत्री आवास योजनेतील ४६ सदनिकांची पारदर्शक सोडत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 19:01 PM
views 19  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजना (AHP) अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पातील सदनिकांची सोडत मंगळवारी (२२ सप्टेंबर) जामसंडे येथील सांस्कृतिक केंद्रात पारदर्शक पद्धतीने पार पडली. अग्रिम रक्कम भरलेल्या ६३ लाभार्थी धारकांपैकी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ४६ लाभार्थ्यांसाठी सोडत काढून त्यांना ४६ सदनिकांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा साक्षी गजानन प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, गटनेते शरद ठुकरूळ, मुख्याधिकारी हरिदत्त माने, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पासाठी अग्रिम रक्कम भरलेल्या एकूण ६३ लाभार्थी धारकांच्या सदनिकांसाठी सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी ४६ लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित असल्याने त्यांच्या उपस्थितीत सोडत काढून ४६ सदनिकांचे वाटप करण्यात आले. उर्वरित लाभार्थी धारकांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत ३० सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.

यावेळी मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी संबंधित प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रकल्प पूर्णत्वास नेऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा शक्य तितक्या लवकर मिळावा, यासाठी नगरपंचायत प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण सोडत प्रक्रिया लाभार्थी, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विकासक यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने पार पडली. नियमानुसार सदनिकांचे वाटप होत असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.