
वैभववाडी : बसमध्ये चढत असताना ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळविणाऱ्या टोळीतील एका संशयित महिलेला वैभववाडी पोलिसांनी अटक केली आहे.
सुरेखा राजू नरदे (रा. कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणातील तिच्या दोन साथीदार महिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी वैभववाडी बसस्थानकात ही घटना घडली होती.वैभववाडी पोलीसांनी बारा दिवसांत या चोरीचा छडा लावला आहे.
शिराळे-गावठणवाडी येथील जयवंती तुकाराम पाटील या आठवडी बाजारासाठी ९ सप्टेंबर रोजी वैभववाडीत आल्या होत्या. बाजारातील काम आटोपल्यानंतर त्या दुपारी साडेबारा वाजता बसस्थानकात पोहोचल्या. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास शिराळेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याची सोनसाखळी लंपास केली.
बसच्या आत गेल्यानंतर पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ बस वाहकाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला त्याच दिवशी सायंकाळी मंगळवेढा येथील एका महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र, तिचा या चोरीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला सोडून देण्यात आले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उल्हास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता जाधव आणि महिला पोलीस कर्मचारी काजल पाटोळे यांनी तपासाला गती दिली. पोलिसांनी वैभववाडीपासून तळेरे, फोंडा, गगनबावडा, कणकवली, सावंतवाडी तसेच रेल्वे स्थानक आणि महामार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
या फुटेजच्या माध्यमातून चोरीनंतर तीन संशयित महिला वैभववाडीतून कोल्हापूरच्या दिशेने गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथून सुरेखा नरदे हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आता तिच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.पोलीसांच्या या कामगारीच सर्वांकडून कौतुक होतं आहे.
अस मारला डल्ला...
चोरीच्या उद्देशाने कोल्हापूर येथील तीन महिला बुधवारी (१९सप्टेबरला)ट्रकमधून वैभववाडीत आल्या होत्या. बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर त्यांनी बसस्थानकाची पाहणी केली. दुपारच्या सुमारास बसची वर्दळ अधिक असल्याचे लक्षात येताच त्यांनी बसस्थानकातच थांबण्याचा निर्णय घेतला.
जयवंती पाटील बसमध्ये चढत असताना दोन महिलांनीही बसमध्ये चढण्याचा बहाणा केला. गर्दीचा फायदा घेत त्यांनी पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यांची तिसरी साथीदार काही अंतरावर उभी राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होती.
चोरी झाल्यानंतर तिघींनी एकमेकींना खुणा करून बसस्थानकातून पळ काढला. त्यानंतर तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोतून त्यांनी पलायन केले. मात्र सीसीटीव्हीत त्या कैद झाल्या होत्या.या फुटेजच्या आधारे पोलिसांनी या टोळीचा माग काढत सुरेखा नरदे हिला अटक केली आहे.उर्वरीत दोघींच्या शोधात पोलीस आहेत.













