LIVE UPDATES

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे

गणेशोत्सवानंतर कर्मभूमीकडे परतीचा प्रवास ; रेल्वे स्थानकांवर गर्दी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 22, 2026 16:30 PM
views 25  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी आपल्या मायभूमीत आलेल्या मुंबईकर चाकरमान्यांनी पाच व सात दिवसांच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर आता पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

 सावंतवाडी रोड,कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली आणि वैभववाडी रोड या प्रमुख रेल्वे स्थानकांवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून जात असून, अनेक गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळणेही कठीण झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वे गाड्या तसेच विशेष गाड्यांची व्यवस्था केली असली, तरी चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या गाड्यांनाही मोठी गर्दी होत आहे. 

तत्काळ तिकीट मिळविण्यासाठीही प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.मुंबई,ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे हजारो चाकरमानी गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणात आपल्या गावी येतात. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात गावागावांत उत्साहाचे वातावरण होते.गणरायाचे आगमन,पूजन, आरती,भजन आणि पारंपरिक कार्यक्रमांचा आनंद घेतल्यानंतर आता गणरायाला निरोप देत चाकरमानी पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहेत. गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर  सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकावर दिसणारे दृश्य भावूक करणारे करणारे आहे.एका हातात सामान सोबत कुटुंबीय आणि मनात गावच्या गणरायाच्या आठवणी घेऊन चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणरायाला निरोप दिल्यानंतर आता पुन्हा भेटू आपल्या कोकणात या आशेने चाकरमान्यांची कर्मभूमीकडे वाटचाल सुरु झाली आहे.प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनही सर्तक असून सावंतवाडी रोड कुडाळ,सिंधुदुर्ग,कणकवली,आणि वैभववाडी रोड स्थानकांवर प्रवाशांची सुरक्षितता गर्दीचे नियोजन आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.गणेशोत्सवाच्या आठवणी मनात साठवून चाकरमानी आता पुन्हा आपल्या रोजीरोटीच्या प्रवासाला निघाले आहेत.त्यामुळे संपूर्ण कोकणातील रेल्वे स्थानके सद्या चाकरमान्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत.