
राजापूर : पुणे ते राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची वरच्या रॅकवर ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी घडली. या बॅगेमध्ये तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा प्रशांत कांबळे (वय ३२, मूळ रा. पासर्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर; सध्या रा. जैतापूर, ता. राजापूर) या पुणे–राजापूर एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २२७२ मधून प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपली काळ्या रंगाची ‘व्हिनस’ कंपनीची बॅग बसमधील वरच्या रॅकवर ठेवली होती. मात्र, प्रवास सुरू असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून ही बॅग लंपास केली.
काही वेळाने बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या बॅगेमध्ये २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत १ लाख ७५ हजार रुपये), ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स (३५ हजार रुपये), ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (३५ हजार रुपये) आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (१७ हजार ५०० रुपये) असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.
या घटनेप्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, बसमधील प्रवासादरम्यान नेमक्या कोणत्या ठिकाणी बॅग चोरीला गेली, तसेच चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा वरच्या रॅकवर ठेवताना प्रवाशांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.














