ब्रेकनंतर एलसीबी पुन्हा ॲक्टिव्ह ?

सावंतवाडीत मटक्यावर कारवाई
Edited by: विनायक गांवस
Published on: April 04, 2026 22:18 PM
views 214  views

सावंतवाडी : शहरात फिरून मटक्याचे आकडे घेणाऱ्या एका इसमासह मालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. जिल्ह्यात अवैध धंद्याघ्या विरोधात मधल्या काळात पोलिसांनी जोरदार कारवाई सत्र सुरू केल होतं. मात्र, मधल्या काळात ही कारवाई थंड पडल्याचे चित्र होते. खुलेआम अवैध धंदे सुरू होते. त्यात कुडाळ नंतर आता सावंतवाडीत मटक्यावर कारवाई करत एलसीबी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्याघ्या विरोधातील हे धाडसत्र खाकी कायम ठेवते का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे. 


जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्याघ्या विरोधात मोहित हाती घेत जिल्ह्यातील तरूणाईला अवैध धंद्याघ्या मार्गाला लागू देणार नसल्याचा निर्धार केला होता. यानंतर जिल्हाभरात पोलिसांकडून धाडसत्र सुरू होते‌. मात्र, मधल्या काळात पोलिसांकडून या कारवाईत खंड पडला होता. खुलाआमपणे काही ठिकाणी अवैध धंदे सुरू होते. त्यामुळे खाकी विरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले असताना एल.सी.बी. कडून धडक कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अवैध धंदे व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. कुडाळ येथील मटका, गांजा कारवाईनंतर आता सावंतवाडीत मटक्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३१ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नेल्सन लुईस (वय ४९, रा. जुनाबाजार, सावंतवाडी) हा इसम शहरात फिरून मटक्याच्या चिठ्ठ्या गोळा करत होता. या व्यवहाराची गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून या दोघांना रंगेहात पकडले. तसेच त्याच्या मालक सुनील आडीवरेकर याच्यावरही कारवाई केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून, यामध्ये पीएसाआय श्री. भोसले, एएसआय श्री. राठोड,  हवालदार श्री. राठोड यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मटक्याच्या चिठ्ठ्या आणि ३१ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. दोन्ही संशयितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती.


दरम्यान, गांजा, दारूसह अवैध धंद्याघ्या सुळसुळाट सुरू असताना कर्नाटक, गोवा मार्गे सावंतवाडीतून हा जिल्ह्यात पुढे जात असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अपेक्षा वाढल्या असून जिल्ह्यातील अवैध धंद्या विरोधातील खाकीची ही मोहीम कायम राहते का ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.