
दोडामार्ग : तिलारी-दोडामार्ग राज्य मार्गावरील आंबेली येथील धोकादायक वळणावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशाल भराणकर (वय २०, रा. बेळगाव) आणि सुफियान आलम (वय २२, रा. पश्चिम बंगाल) अशी जखमींची नावे आहेत. दोघांनाही दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
तिलारी-दोडामार्ग राज्य मार्गावर आंबेली येथे सध्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली असून, दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून कोणतेही सूचना फलक अथवा सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून वारंवार केला जात होता. याबाबत प्रशासनाचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर गुरुवारी भीषण अपघात घडला.
विशाल भराणकर आणि सुफियान आलम हे दोघेही पणजी (गोवा) येथील एका कॅसिनोमध्ये कामाला आहेत. जांबोटी येथील त्यांच्या एका मित्राच्या घरी बुधवारी कार्यक्रम असल्याने त्याने या दोघांसह अन्य मित्रांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी विशाल आणि सुफियान हे दुचाकीने दोडामार्गमार्गे पणजीच्या दिशेने निघाले होते. त्यांचे अन्य दोन मित्र दुसऱ्या दुचाकीने पुढे जात होते.
दरम्यान, आंबेली येथील वळणावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक एकाच बाजूने सुरू होती. याचवेळी दोडामार्गहून पिकुळेच्या दिशेने जाणारी एसटी बस आंबेली येथे आली. रस्त्याच्या स्थितीचा अंदाज न आल्याने दुचाकीचालकाचा गोंधळ उडाला आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटले.
दुचाकी एसटी बसला एका बाजूने घासत गेली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात विशाल आणि सुफियान यांना गंभीर दुखापत झाली. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते.
अपघाताचा आवाज ऐकून पुढे गेलेल्या त्यांच्या मित्रांनी मागे वळून पाहिले असता हा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मार्गस्थ वाहनचालकांनीही मदतीसाठी धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमींना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सूचना फलकांचा अभाव ठरतोय धोकादायक
आंबेली येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थ आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप होत आहे. या अपघातानंतर तरी प्रशासनाने आणि ठेकेदाराने जागे होऊन रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








